Mon, Jul 22, 2019 13:11होमपेज › Nashik › धुळ्यात मराठा मोर्चाला लाखोंची गर्दी

धुळ्यात मराठा मोर्चाला लाखोंची गर्दी

Published On: Jan 12 2018 6:19PM | Last Updated: Jan 12 2018 8:32PM

बुकमार्क करा
धुळे : यशवंत हरणे

वाढती गुंडगिरी अन् कायदा-सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा याविरोधात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने धुळ्यात काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. व्यापार्‍यांसह समाजातील लाखो तरुणांनी मोर्चात हजेरी लावत शहर गुंडगिरी, अवैध धंदेमुक्‍त करण्याची मागणी केली. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर निघालेल्या या क्रांती मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

महाराष्ट्र बंददरम्यान काही तरुणांनी तोडफोड करत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने याबाबत सकल मराठा सामाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, कारवाई न झाल्याने या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजन समितीने जाहीर केले होते. सकाळी चाळीसगाव रोड चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा आग्रारोडमार्गे कराचीवाला खुंट, महानगरपालिकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंचा जयघोष करण्यात आला. मोर्चाचे पहिले टोक जिल्हाधिकारी कार्यालय, तर दुसरे आग्रा रोडवरील प्रभाकर चित्रमंदिरापर्यंत होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. मोर्चात तरुणांनी ढोल-ताशांच्या तालावर फेरही धरला.

एकता भागवत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. त्यात महाराष्ट्र बंददरम्यान आक्षेपार्ह घोषणा देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, बंदमध्ये काही तडीपार गुंड सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी माजी आमदार शरद पाटील, नगरसेवक मनोज मोरे, तसेच प्रदीप जाधव आदींनी मार्गदर्शन केले. यात  शहरात गुंडांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. चौकांमधे टारगट तरुण एकत्र बसतात व विद्यार्थिनींची छेड काढतात. हा प्रकार थांबविण्याऐवजी पोलीस हप्‍तेखोरी करण्यात गुंतल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चादरम्यान साफसफाई करण्यात आली.  माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, साहेबराव देसाई, माजी महापौर मोहन नवले, शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, संजय वाल्हे, राजेंद्र इंगळे, प्रदीप जाधव, डॉ. माधुरी बाफणा, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, ज्ञानेश्‍वर भामरे, राजेंद्र ढवळे, नगरसेविका प्रतिभा चौधरी, संजय बोरसे, निरंजन भतवाल, विजय देवकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शांतता अन् संयम

मोर्चादरम्यान पारोळा रोडने एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली असता, क्षणाचाही वेळ न दवडता गर्दीने रुग्णवाहिकेला वाट करून दिली. तर मोर्चा काढणार्‍या समितीने व्यापार्‍यांना व्यवसाय सुरू ठेवण्याचे आवाहन केल्याने आग्रा रोडवरील सराफ बाजार, चैनी रोडवरील भाजी बाजार आणि अकबर चौकापर्यंतचा फळ बाजार सुरळीत सुरू होता. आग्रा रोडवरील व्यापार्‍यांनी घोषणा देत मोर्चात सहभाग नोंदविला. मोर्चेकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आदी सुविधा परविण्यात आल्या होत्या.