Wed, Feb 20, 2019 00:23होमपेज › Nashik › धुळ्यात दंगल; अकरा ताब्यात

धुळ्यात दंगल; अकरा ताब्यात

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 21 2017 11:28PM

बुकमार्क करा

धुळे : प्रतिनिधी

बॅनर लावण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यावसान थेट दंगलीत होऊन जाळपोळ, तसेच दगफेडक करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत बळाचा वापर केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेत एका दुकानाचे आग लागून नुकसान झालेे. तर पोलीस निरीक्षक जखमी झाला आहे. गुरुवारी सकाळी पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी धुळे शहरात धाव घेत पाहणी केली. आतापर्यंत 11 संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन्ही गटांच्या प्रत्येकी 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती चौबे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

धुळे येथील गजानन कॉलनी परिसरातील अरिहंत भवनानजीक रात्री 11.30 च्या सुमारास अचानक दोन गट समोरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूंकडून तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच, घटनास्थळी दंगल नियंत्रणासाठी आलेल्या पोलीस पथकावरदेखील दगडफेक झाल्याने पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी हे जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. मात्र, तरीही जमावाचा धिंगाणा सुमारे दोन तास सुरू होता. घटनास्थळापासून सुमारे तीन किलोमीटर दूर असणार्‍या पाचकंदील चौकातील धान्य दुकानांना अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा प्रयत्न केला. यात बारदान आणि पुठ्ठे जाळल्याने धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने दोन बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या दोन्ही घटनास्थळांवर पोलीस पथकाने रात्रभर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी चाळीसगाव रोड ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच, शिवसेनेच्या वतीने पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.