होमपेज › Nashik › 'वादग्रस्त घोषणा देणार्‍यांवर कारवाई करा'

'वादग्रस्त घोषणा देणार्‍यांवर कारवाई करा'

Published On: Jan 04 2018 9:00PM | Last Updated: Jan 04 2018 9:00PM

बुकमार्क करा
धुळे : प्रतिनिधी

धुळ्यात बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चात काही तरुणांनी शिवीगाळ करत वादग्रस्त घोषणा दिल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, धुळ्यात महाराष्ट्र बंददरम्यान पोलिसांसमोर तोडफोड होत असतानाही आंदोलकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावेळी काही आंदोलकांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्या. याचे मोबाईल, तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आले आहे. याबाबत मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आल्यानंतर हे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आक्षेपार्ह वक्तव्य असलेले चित्रण प्रशासनाकडे देण्यात आले असून, बंददरम्यान अवैध धंदे करणारे तडीपार गुंड फिरत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. हे गुंडच धुळ्यात झालेल्या तोडफोडीस जबाबदार असून, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी फोनवरून जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार यांना संपर्क करून याविषयीची माहिती दिली. यावेळी नगरसेवक मनोज मोरे, कमलेश देवरे, साहेबराव देसाई, लहु पाटील, हेमंत भडक, अमोल मराठे, गौरव पवार, बंटी देवकर आदी उपस्थित होते.

भीमा कोरेगाव दंगलीचाही निषेध

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने भीमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याचाही  निषेध करण्यात आला असून, काही तरुण जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी असे वादग्रस्त कृत्य करत असल्याने पोलिसांनी अशा प्रवृत्ती शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.