Tue, May 21, 2019 00:47होमपेज › Nashik › धर्मा पाटील आत्‍महत्‍या : संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्‍हा ?

धर्मा पाटील आत्‍महत्‍या : संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्‍हा ?

Published On: Mar 08 2018 4:48PM | Last Updated: Mar 08 2018 4:40PMधुळे : यशवंत हरणे

सरकारने आम्हाला भूमीहीन करून रस्त्यावर आणले आहे. आमच्या परिवाराला शेतीच्या मोबदल्यात पैसे नको तर आमची पाच एकर जमीनीप्रमाणेच शेती द्यावी, परिवारातील कर्ता व्यक्ती जाऊनदेखील सरकार आमचा छळ करते आहे. मोबदल्याच्या नावाखाली अधिकारी आणि मंत्री टोलवा टोलवीचे धोरण राबवित आहे असा आरोप आज धर्मा पाटील यांच्या परिवाराने धुळ्यात केला. आता सरकारी अधिकारी, दलाल आणि विद्यमान सरकारमधील संबंधित मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.

धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज महिला दिनानिमित्त आपण पती धर्मा पाटील यांच्या मृत्यूचा न्याय मागण्यासाठी आल्याची प्रतिक्रीया यावेळी धर्मा पाटील यांची पत्नी सखुबाई यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. त्यांच्या समवेत मुलगा नरेंद्र पाटील हे धर्मा पाटील यांच्या अस्‍थी घेऊन आले होते. आपल्या भावना व्यक्त करताना सखुबाई पाटील यांनी सांगितले की, पतीचे निधन होऊन एक महिना उलटूनदेखील जिल्हा प्रशासनापासून मंत्रालयीन अधिकारी आणि मंत्री पाटील परिवाराला न्याय देण्याऐवजी वेळ काढूपणाची भूमिका करीत आहेत. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह शेतीवरच होता, पण आता विकास प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने भुमिहीन केले आहे. 

आमची मागणी पैशांची नसून समान न्याय तत्वानुसार अन्य शेतकर्‍यांप्रमाणेच मोबदला देण्याची आहे. सरकारला हे शक्य नसल्यास आम्हाला प्रकल्पात गेलेल्या शेतीच्या मोबदल्यात पाच एकर शेती, विहीर, सिंचन साहित्य आणि आंब्याचे झाडे लावून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नरेंद्र पाटील यांना आई सखुबाई यांना आवरणे कठीण जात होते. राज्य शासनाच्यावतीने ४ मार्च रोजी मुंबई येथे बैठकीस बोलावण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार रावल आणि राज्यातील अन्य अधिकार्‍यांसह धुळयाचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, भू संपादन अधिकारी रविंद्र भारदे तसेच चौबळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आपण शेजारच्या शेतातील नुकसानीच्या मोबदल्याप्रमाणे पैसे मिळाले पाहीजे, ही भुमिका मांडली. मात्र मंत्री आणि अधिकारी यांनी टोलवा टोलवी सुरू केल्याने आपण बैठकीतून निघुन आल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. सरकारने पुर्नमुल्यांकनाच्या नावाखाली ४८ लाख रूपये देऊ केले आहे. पण हा मोबदला आपणास मान्य नाही. सरकारने सेवानिवृत्त न्यायधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र हा पर्याय मान्य नाही. विखरण भागात एका गटात कोरडवाहू जमीनीस २० लाख रूपये मोबदला दिला जातो .पण आम्हाला बागायत असुनही अन्याय केला जातो. ही बाब अन्यायकारक असुन धर्मा पाटील यांनी न्यायासाठी बलिदान दिले आहे. आता त्यांचा लढा पुढे सुरू ठेवणार असुन संपुर्ण न्याय मिळेपर्यंत आपण धर्मा पाटील यांच्या अस्थिंचे विसर्जन करणार नसुन आता सरकारमधील संबंधित मंत्री, राज्य आणि जिल्ह्यामधील संबंधित अधिकारी, दलाल यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार आहे. यासाठी मुंबई येथे मंत्रालयात धरणे धरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.