Mon, Apr 22, 2019 16:19होमपेज › Nashik › पश्‍चिमवाहिनी नद्यांचा सविस्तर अहवाल हवा

पश्‍चिमवाहिनी नद्यांचा सविस्तर अहवाल हवा

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 12:19AMनाशिक : प्रतिनिधी

नार-पार, दमणगंगा-पिंजाळ या पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे राज्याने लोटांगण घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली. सरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करावा. तसेच योग्य ती कारवाई न केल्यास येत्या काळात राष्ट्रवादी प्रत्येक तालुक्यात सभा घेईल, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे व आमदार जयंत जाधव उपस्थित होते.

पश्‍चिम वाहिनी नद्यांचे एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात मात्र नार-पार-गिरणा जोड प्रकल्पाच्या अहवालासाठी साडेतेरा कोटींचा निधी मंजूर करत राज्याच्या हक्‍काचे पाणी गुजरातला देण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला. या प्रकल्पासोबतच दमणगंगा-गोदावरी लिंकचा सविस्तर अहवाल सरकार का तयार करत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

तापी खोरे महामंडळाने राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणाच्या अहवालाला मंजुरी देत नार-पारच्या खोर्‍यात 19.38 टक्के पाणी उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात वळविणे शक्य असल्याचे म्हणाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत राज्य सरकारने केवळ 10.50 टक्के टीएमसी पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा अहवाल तयार करण्यास मान्यता देत निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उर्वरित पाणी नार-पार-तापी खोर्‍यातून गुजरातला पळविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. नार-पार, दमणगंगा-एकदरे खोर्‍यात एकूण 133 टीएमसी पाणी आहे. नार-पार-गिरणा व दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी प्रकल्पाद्वारे तापी, गिरणा व गोदावरी खोर्‍यात वळविणे शक्य आहे. त्यामुळे येवला, नांदगाव व चांदवडला तसेच जळगाव, धुळे, मराठवाड्याला फायदा होईल, असा विश्‍वास पगार यांनी व्यक्‍त केला.