Fri, Sep 21, 2018 03:41होमपेज › Nashik › चिमुरडीपाठोपाठ जखमी आजीचाही मृत्यू 

चिमुरडीपाठोपाठ जखमी आजीचाही मृत्यू 

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 12:12AMपंचवटी : वार्ताहर  

पंचवटीतील मायको दवाखान्याजवळ सोमवारी (दि.6) अनैतिक संबंधातून घडलेल्या जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीपाठोपाठ तिच्या जखमी आजीचाही उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.7) मृत्यू झाला. दरम्यान, काही तासांतच तपासाची चक्रे वेगाने फिरवून पंचवटी पोलिसांनी या घटनेतील जलालोद्दीन खान या संशयिताला उत्तर प्रदेशातील अलिगड येथून ताब्यात घेतले आहे. 

कालिकानगर येथील संगीता सुरेश देवरे (38) या महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून प्रियकर जलालोद्दीन खान (55 रा. कानोरीय, जि. मथुरा, रा. उत्तर प्रदेश) या नराधमाने सोमवारी (दि.5) पहाटेच्या सुमारास संगीतासह तिची मुलगी प्रीती शेंडगे आणि नात सिद्धी हे झोपेत असताना त्यांच्या बेडवर आणि अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. घटनेनंतर संशयित जलालोद्दीन खान हा फरार झाला होता. या घटनेत नऊ महिन्यांच्या सिद्धी या निरागस चिमुरडीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर संगीता आणि प्रीती या 70 टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी मृत चिमुरडीची आजी संगीता देवरे हिचाही मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर प्रीती शेंडगे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.