Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Nashik › नाशिकमध्ये परप्रांतीयाने पत्‍नीला जाळून मारले

नाशिकमध्ये परप्रांतीयाने पत्‍नीला जाळून मारले

Published On: Jun 14 2018 5:52PM | Last Updated: Jun 14 2018 5:54PMसातपूर : वार्ताहर 

येथील शिवाजीनगरमधील सुरु असलेल्या बांधकाम साईटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या पतीने पत्नीची घरगुती भांडणातून दि.१२ जून रोजी रात्री १ वाजता ज्वलनशील पदार्थ टाकून पत्‍नीला जाळून मारल्याची घटना घडली आहे. यामध्ये पत्नी आयशा ही शंभर टक्के भाजल्यामुळे घटनास्थळीच मृत्यूमुखी पडली. आरोपी पती समशेरदेखील ३५ टक्के भाजला असून त्याच्यावर गंगापूर पोलिसांच्या देखरेखीखाली सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत आयशा समशेर शाह (वय ३८, रा. एकदंत हाईटस, शिवाजीनगर, सातपूर. मुळगाव बिहार)  आरोपी पती समशेर अबलोश शाह (वय ३८) येथे राहणारे आहेत. दि.१२ जून रोजी रात्री १ वाजता दोघामध्ये वाद झाले. या वादातून आरोपी समशेर यांनी पत्नी आयशा हिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिले. यामध्ये आयशा पूर्ण जळल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये संशयित समशेरदेखील ३५ टक्के भाजला आहे.

शिवाजीनगर मधील ध्रुवनगर भागात एकदंत हाईटसचे बांधकाम सुरु आहे. साईटवरील ठेकेदार पंडीत याने सदर पती-पत्नीला वाचमन म्हणून कामाला ठेवले होते. दि.१२ रोजी मध्यरात्री सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या परिसरातील एका नागरिकाने गंगापूर पोलिसांना फोन करून सदर खोलीमध्ये आग लागली असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याचे पीएसआय डी. एल. माळी यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत आयशा जळून मृत अवस्थेत पडली होती.

घटनेचा अधिक तपास केला असता संशयित आरोपी पती समशेर यानेच पत्नीला जाळल्याचे उघड झाले. संशयित समशेर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जे. मोरे करीत आहेत.