Wed, Jan 16, 2019 20:35होमपेज › Nashik › दु:खात सहभागी होते गाय!

दु:खात सहभागी होते गाय!

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:29AMअजंग-वडेल : वार्ताहर

संत ज्ञानेश्‍वर माउलींनी पसायदानात सांगितल्याप्रमाणे ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’ असा काहीसा अनुभव वडेलचे ग्रामस्थ ‘ती’च्याकडून अनेकदा घेताहेत. तिला बोलता येत नाही. माणसाबद्दलची आपुलकी शब्दात मांडता येत नाही. पण ती आपल्या एका छोट्या कृतीतून माणसासोबतच्या आपल्या ऋणानुबंधाचे दर्शन घडवित आहे.

नाना पावजी शेलार यांच्या मालकीची गाय काही वर्षांपासून गावात फिरते. ही गोमाता गेल्या काही वर्षांपासून गावातील जवळजवळ सगळ्याच मयतांच्या अंत्ययात्रेत सामील होत आली आहे. मृतकाचे घर ते स्मशानभूमी हे अंतर ती इतर शोकाकुल मंडळींसोबत अतिशय शांतपणे पार पाडते. तिथे गेल्यानंतर संपूर्ण विधी झाला की अग्‍निडाग दिल्यानंतर ती मार्गस्थ होते. ही घटना काही एक-दोनदा नव्हे तर अनेक वर्षांपासून नियमित घडत आहे. तुरळक अपवाद वगळता गोमाता अंत्यविधीसाठी हजर असते असतेच.

तिचा हा गुण वडेलकरांच्या परिचयाचा तर आप्तेष्टांच्या द‍ृष्टीने चर्चेचा विषय ठरत आहे. सुखात सामील होण्यास तर सगळेच असतात; परंतु दुःखाच्या प्रसंगी अनेकांची साथ सुटते, असे म्हणतात. तिथे अंतिम प्रवासाला निघालेल्या प्राणज्योतीला निरोप देण्यासाठी न चुकता हजेरी लावणारी गोमाता स्वार्थी जणांना अंतर्मुख करायला लावते.