होमपेज › Nashik › बोंडअळी नुकसानभरपाई : राज्य सरकारकडून ११०० कोटींची मदत जाहीर

बोंडअळी नुकसानभरपाई : राज्य सरकारकडून ११०० कोटींची मदत जाहीर

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:44AMनाशिक : प्रतिनिधी 

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना लवकरच 1100 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील मालेगाव व येवल्यामधील बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात गतवर्षी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. राज्यातील 43 लाख हेक्टरपैकी जवळपास 34 हेक्टरवरील कापूस खराब झाला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव व येवला तालुक्यातील 33 हजार 880.28 हेक्टरपैकी 27 हजार 713.43 हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे बोंडअळीमुळे नुकसान झाले. यामध्ये जिरायत क्षेत्रावरील 24924, तर बागायती क्षेत्रातील 2789 हेक्टरवरील कापसाचा समावेश आहे. यामुळे 37 हजार 781 शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने 20 कोटी 70 लाख 3 हजार 96 रुपयांची मदतीची मागणी सरकारकडे केली होती. 

सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, जिल्ह्यासह राज्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी आर्थिक मदत देण्याचे घोषित केले होते. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नव्हती. परिणामी अगोदरच संकटात सापडलेला बळीराजा हवालदिल झाला होता. सरकारी मदतीकडे तो डोळे लावून बसला होता. दरम्यान, सरकारने राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांसाठी 1100 कोटी रुपयांची मदत देण्याच निर्णय घेतला आहे. लवकरच ही नुकसानभरपाईची रक्‍कम शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे भरपाईसाठी डोळे लावून बसलेला जिल्ह्यातील शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.