Mon, Mar 25, 2019 09:50



होमपेज › Nashik › साहेब काहीही करा, पण आयुक्‍त मुंढे यांना आवरा

साहेब काहीही करा, पण आयुक्‍त मुंढे यांना आवरा

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 11:52PM



नाशिक : प्रतिनिधी 

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंढे यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (दि.15) भाजपा नगरसेवकांची मुंबईत बैठक बोलावली होती. यावेळी नगरसेवकांनी नागरिकांना लाखो रुपयांची आलेली घरपट्टी सोबत नेत मुख्यमंत्र्यांच्या हातात दिली. ‘साहेब, काहीही करा, पण मुंढे यांना आवरा’, असे साकडेच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना घातल्याचे समजते.

आयुक्‍त मुंढे यांनी महासभेचा अधिकार डावलून घरपट्टीत अव्वाचा सव्वा वाढ केली. एवढेच नव्हे तर पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींनादेखील घरपट्टीच्या कक्षेत आणले. तसेच, शहरातील मोकळे भूखंड, घराच्या आजूबाजूचा मोकळा ओपन स्पेस यावरदेखील घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांच्यात तीव्र संतापाची लाट आहे. नागरिकांना सुधारित दराची लाखो रुपयांचे घरपट्टींचे देयके आली आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांचा या घरपट्टी दरवाढीला विरोध आहे. मात्र, आयुक्‍त मुंढे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. सत्ताधारी या नात्याने भाजपाला या नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जनतेमध्ये भाजपाविरोधात जनक्षोभ आहे. त्यामुळे मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित करत आयुक्‍त मुंढे यांची गार्‍हाणे मांडली. तसेच, उद्योजकांना दरवाढीमुळे लाखो रुपयांची घरपट्टीची देयके आली आहेत. त्याच्या काही प्रती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखविल्या. घरपट्टीवाढीच्या निर्णयात नागरिकांना सवलत दिली नाही तर आगामी निवडणुकीत त्याचा मोठा फटका पक्षाला सहन करावा लागू शकतो, हा मुद्दा नगरसेवकांनी मांडला. तसेच, साहेब काहीही करा, घरपट्टी दरवाढीत सवलत द्या, असे साकडे त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना घातल्याचे समजते. दरम्यान, सध्या आचारसंहिता सुरू असल्याने याबाबत काही ठोस आश्‍वासन देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळल्याने बोलले जात आहे.