होमपेज › Nashik › धुळ्याचे नगरसेवक शार्दुल भाजपाच्या वाटेवर!

धुळ्याचे नगरसेवक शार्दुल भाजपाच्या वाटेवर!

Published On: Feb 14 2018 1:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:54PMधुळे : प्रतिनिधी

धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिनेश शार्दुल यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार अनिल गोटे यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. शार्दुल हेदेखील भाजपाची वाट धरणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्‍का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व समाजाच्या नगरसेवकांना महत्वाच्या पदांवर बसविण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, सुतार समाजाबाबत आश्‍वासन पाळले नसल्याने असा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया शार्दुल यांनी दिली आहे.

धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला लागोपाठ गळती लागणे सुरूच आहे. महापौर जयश्री अहिरराव, उपमहापौर फारूख शहा, स्थायी समितीचे सभापती सोनल शिंदे, शहर विकास आघाडीचे नगरसेवक फिरोज लाला, महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती रश्मी जुलाहा बानो यांच्यासह अन्य कार्यकत्यांनी पक्षांतर केले. यातील बहुसंख्य पदाधिकार्‍यांनी मनपामध्ये मिळालेल्या पदाचा कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पक्षाकडून पदे देऊनदेखील नगरसेवक राष्ट्रवादीला का सोडतात, अशी टीका नेहमी होते आहे. आता नगरसेवक शार्दुल यांनी गोटे यांची भेट घेतली.