होमपेज › Nashik › नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आणि हॉटेल चालकाला कोरोना 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आणि हॉटेल चालकाला कोरोना 

Last Updated: May 25 2020 2:23PM

फोटो : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (छाया : देवानंद बैरागी)पंचवटी : पुढारी वृत्तसेवा             

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आणि हॉटेल चालकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याने बाजार समिती तीन दिवस बंद ठेवून साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तर कोरोना बाधित व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून क्रांतीनगर येथे राहणाऱ्या आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे .  

वाचा : धुळ्यात आणखी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका भाजीपाला व्यापाऱ्याला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बाजार समितीमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यातच पुन्हा बाजार समितीच्या आवारात असलेल्या हॉटेल चालकाला कोरोनाची लागण झाल्याने बाजार समितीमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले. तर क्रांतीनगर येथे राहणाऱ्या भाजीपाला खरेदी विक्री करणाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याने बाजार समितीमध्ये कोरोना बाधितांची साखळीच तयार झाली. सोमवार दि २५ रोजी भाजीपाला व्यापाऱ्याचा कोरोना विषाणूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून हॉटेल व्यावसायिकाची तब्बेत देखील गंभीर असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली आहे. या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील एका महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची चर्चा सुरु आहे. 

वाचा : नाशिक जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या 51 वर 

या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संचालक जगदीश अपसुंदे, चंद्रकांत निकम आणि संदीप पाटील यांनी बाजार समिती तीन दिवस बंद ठेवून या दरम्यान संपूर्ण बाजार समितीची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्याची मागणी केली. तसेच बाजार समितीमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करणे,विना पास धारकास मार्केटमध्ये प्रवेश देऊ नये, मुंबई, ठाणे आणि मालेगाव, परिसरातील वाहनांना प्रवेश बंदी करण्याच्या सूचना देखील निवेदनात केल्या आहे. याबाबत सभापती संपत सकाळे यांनी संचालक मंडळ आणि बाजार समिती प्रशासनाशी चर्चा करून मंगळवार दि २६, बुधवार दि २७ आणि गुरुवार दि २८ रोजी दिंडोरी रोडवरील बाजार समिती आणि पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपला भाजीपाला तीन दिवस बाजार समितीमध्ये आणू नये असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे . 

सरकारी अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेने बाजार समितीला भेट देऊन पाहणी करणे गरजेचे आहे . तसेच कोरोना बाधित रुग्नांच्या संपर्कात कोणकोण आले होते याची माहिती घेऊन त्या नागरिकांना वेळीच कोरंटाईन करणे गरजेचे आहे . बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या हमाल वर्गाला जर कोरोना विषाणूची लागण झाली तर आजूबाजूच्या झोपडपट्टीमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि प्रशासनाची मोठी धावपळ उडण्याची शक्यता आहे .