Sun, Jul 21, 2019 06:15होमपेज › Nashik › बांधकामासंदर्भातील कामे ऑटो डीसीआर प्रणालीनेच होणार

बांधकामासंदर्भातील कामे ऑटो डीसीआर प्रणालीनेच होणार

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 16 2017 11:50PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

बिल्डिंग प्लॅन मंजुरीसह बांधकामाशी संबंधित विविध कामांत सुटसुटीतपणा येण्यासाठी मनपाने सुरू केलेल्या ऑटो डीसीआरप्रणालीला नगररचना विभागातीलच काही अभियंत्यांकडून खोडा घातला जात आहे. मात्र, यासंदर्भात आयुक्तांनी ठाम भूमिका घेत बांधकामसंदर्भातील कामे ऑटो डीसीआर प्रणालीद्वारेच होणार असल्याचे स्पष्ट करत संबंधित अभियंत्यांना इशारा देऊ केला आहे. 

 सहा महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ऑटो डीसीआर प्रणाली सुरू केली आहे. परंतु, आर्किटेक्ट आणि बांधकाम व्यावसायिकांकडून या प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतरही नगररचनामधील काही अभियंते व कर्मचारी कागदोपत्रीदेखील प्रस्ताव सादर करण्यास सांगत असल्याने व्यावसायिक वैतागले आहेत. यासह विविध कारणांबाबत शनिवारी (दि.16) द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या नाशिक शाखेतर्फे आयुक्तांची भेट घेण्यात आली. सध्या ऑटो डीसीआरद्वारे नगररचना विभागाकडे 500 प्रकरणे सादर करण्यात आली आहेत. त्यापैकी 107 प्रकरणे ऑनलाइन मंजूर दिसत असली तरी अद्याप ती मिळालेली नाही. प्रणालीचे काम अधिक चांगले व्हावे, यासाठी आर्किटेक्टसनाही ऑटो डीसीआरचे सॉफ्टवेअर मिळावे, व्यावसायिकांकडून सादर होणार्‍या प्रकरणांची छाननी करण्यासाठी स्क्रूटिनी सेंटर सुरू करावे, अशी मागणी संघटनेतर्फे अध्यक्ष प्रदीप काळे यांनी केली. त्याचबरोबर डिजिटल साइन आणि प्रमाणपत्र मिळत नसल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर सॉफ्टवेअर देण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगत आयुक्तांनी स्क्रूटिनी सेंटर तत्काळ सुरू करण्याची सूचना नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागूल यांना केली. यावेळी आर्किटेक्ट सचिन गुळवे, रसिक बोरा, किरण राजवाडे, योगेश महाजन, चारुदत्त नेरकर, अविनाश कोठावदे, जयवंत पवार आदी उपस्थित होते.