Thu, Aug 22, 2019 15:12होमपेज › Nashik › 'ईव्हीएम'मध्ये दोष काढणे पडले महागात 

'ईव्हीएम'मध्ये दोष काढणे पडले महागात 

Published On: Apr 23 2019 5:14PM | Last Updated: Apr 23 2019 5:14PM
जळगाव : पुढारी ऑनलाईन 

लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान  आज (ता. २३) पार पडत आहे. भुसावळ येथील मतदान केंद्र क्रमांक 35 रेल्वे नॉर्थ कॉलनी येथे एका मतदाराने मतदान केल्यावर व्हीव्हीपॅटवर मला दिसले नाही असा आक्षेप घेतला. मात्र, तो आक्षेप खोटा निघाल्याने त्या मतदारांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही राज्यातील पहिलीच घटना असेल असे बोलले जात आहे. 

भुसावळ विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्र. ३५ रेल्वे नॉर्थ कॉलनी येथे सकाळी ९.३० वा. अमोल रामदास सुरवाडे (वय २४ रा. चांदमारी चाळ) याने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माझे मतदान झाले नाही व व्हीव्हीपॅट मशिनवर मला वेगळे आणि अस्पष्ट दिसले असून मतदान दुसर्‍याला झाल्याचा आक्षेप घेतला. त्यानंतर मतदान केंद्र अधिकार्‍यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन ते मत तपासून पाहिले असता बरोबर निघाले. 

मतदाराने मतदान झाले नसल्याचे खोटे सांगितले म्हणून मतदान केंद्राधिकारी योगेश दिलीप चौधरी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात ९४/१९ भादंवि १७७,१७७(फ) , लोकप्रतिनिधी कायदा १५१ कलम २६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

मतदाराने मतदान केल्यानंतर ७ ते ८ सेंकदामध्ये व्हीव्हीपॅट यंत्रात त्याने केलेल्या मतदानाची माहिती दिसते. मतदाराने ज्यांना मतदान केले आहे त्यांना ते गेले नसल्याची खात्री झाल्यास तो तशी तक्रार केंद्राच्या अध्यक्षांकडे करू शकतो. अधिकारी त्या तक्रारीची दखल घेत त्याने केले मतदान बरोबर झाले नाही किंवा नाही याची खात्री करतात. 

मतदाराने ईव्हीएम यंत्रावरच संशय घेतला असल्यास त्या मतदाराला पुन्हा मतदान करावयास लावले जाते. परंतु, तेव्हा हे मतदान गुप्त नसते. परंतु मतदान योग्य झाल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा नोंद केला जातो. या गुन्ह्यात सहा महिने शिक्षा व दंडाची तरतुद आहे. परंतु तर तक्रारीत सत्यता आढळल्यास ते यंत्र सील करुन नविन यंत्र उपलब्ध केले जाते.