Thu, Jul 18, 2019 12:51होमपेज › Nashik › आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आगमनालाच फोडला घाम

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आगमनालाच फोडला घाम

Published On: Feb 09 2018 3:49PM | Last Updated: Feb 09 2018 4:08PMनाशिक : प्रतिनिधी 

तुकाराम मुंढे यांनी आज (दि.9) सकाळी बरोब्बर दहाच्या ठोक्याला महापालिकेत हजेरी लावत आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर राजीव गांधी भवनमधील विविध कक्ष व कार्यालयांची पाहणी  करत खातेप्रमुखांची बैठक घेतली. याच बैठकीत अग्निशमन विभागाचे प्रमूख अनिल महाजन यांनी अग्निशमनचा गणवेश न घालताच बैठकीला हजेरी लावली. ही बाब आयुक्तांनी हेरून महाजन यांना  परत माघारी पाठवत गणवेशमध्येच येण्याचे फर्मावले. मुंढे यांच्या पहिल्याच दिवसाच्या दणक्याने अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांनाही घाम फुटला.

वाचा बातमी : पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंचा सिक्सर

पुणे महानगर परिवहन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार  सोडत मुंढे यांचे शुक्रवारी (दि.9) सकाळी राजीव गांधी भवन येथे आगमन झाले. यावेळी  संबंधित सर्व खातेप्रमुख हजर होते. सकाळी 10 वाजता त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार  स्विकारला आणि त्यानंतर अवघ्या दहा मिनिटानंतर विविध कार्यालयांना भेटी देऊन  माहिती करून घेतली. यानंतर लगेचच त्यांनी खातेप्रमुखांना आढावा बैठकीसाठी बोलविले.  त्यात प्रत्येक खातेप्रमुखांची ओळखपरेड घेतली असता अग्निशमन विभागाचे प्रमूख अनिल महाजन हे अग्निशमन विभागाच्या गणवेशात नसल्याची बाब मुंढे यांच्या निदर्शनास  आली. 

गणवेशाविषयी विचारताच महाजन हे निरूत्तर झाले. बैठक सुरू असतानाच त्यांना कपडे बदलून गणवेश घालून येण्याचे आदेश दिले. यानंतर महाजन तडक निवासस्थानी गेले आणि लगेचच काही  वेळात गणवेश बदलून आले. आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून  अधिकार्‍यालाच कैचीत पकडल्याने ही चर्चा वार्‍यासारखी पसरली. या घटनेने मनपातील इतर  अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्याही उरात धडकी भरली असून, गळ्यात ओळखपत्र घालण्याची   सूचना प्रत्येक खातेप्रमुखांनी आपापल्या विभागातील कर्मचार्‍यांना केली आहे.