Sat, Aug 17, 2019 16:54होमपेज › Nashik › तुकाराम मुंढे यांनी उघडली बंद व्‍यायामशाळा, अभ्यासिकेची दारे

तुकाराम मुंढे यांनी उघडली बंद व्‍यायामशाळा, अभ्यासिकेची दारे

Published On: May 26 2018 11:45AM | Last Updated: May 26 2018 11:45AMनाशिक रोड : वार्ताहर 

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर उपक्रमामुळे मागील चार वर्षांपासून बंद असलेल्या व्यायाशाळा अन्‌ वाचनालयाचे दरवाजे उघडले. तसेच येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा, तसेच व्यायाम शाळेच्या आवारातील म्हशीच्या गोठा आणि पत्र्याचे शेड दोन तासात जमिनदोस्त करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले, यामुळे या गोष्टींकडे कानाडोळा करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शनिवारी ( दि. २६ ) सकाळी सहा वाजता नाशिकरोड येथील शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर वॉक विथ कमिशनर उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दीपक ठाणकर नावाच्या युवकाने नाशिकरोड परिसरातील धोंगडे मळा परिसरातही व्यायाम साहित्य असूनही मागील काही वर्षापासून बंद असणाऱ्या व्यायाम शाळा आणि आवारात सुरू असणाऱ्या गोठ्याची तक्रार दिली. त्याचप्रमाणे गावळीवाडा येथे बंद असणाऱ्या व्यायाम शाळा आणि त्यामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाची माहिती आयुक्त मुंढे यांना देत कारवाई करण्याची मागणी केली.

मुंढे यांनी कार्यक्रम आटोपताच मी स्वतः बघून खातरजमा करतो, असे तक्रारदार युवकाला आश्वासन दिले. एकीकडे वॉक विथ कमिशनर उपक्रम सुरू असतानाच दुसरीकडे बंद व्यायाम शाळा आणि अभ्यासिका उघडण्यात आली, विशेष म्हणजे यावेळी एक नगरसेवकदेखील तात्काळ हजर झाले. कार्यक्रम आटोपताच मुंढे यांनी व्यायाम शाळेची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी आमदार बाळासाहेब सानप याच्या निधीमधून व्यायाम साहित्य खरेदी केले असल्याने अद्याप व्यायाम शाळा खुली केली नसल्याचे उत्तर दिले. मुंढे यांनी उत्तर ऐकत अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरून व्यायाम शाळा खुली करण्याचे आदेश दिले. आवारातील म्हशींचा गोठा पाहून आयुक्त मुंढे प्रचंड संतापले, त्यांनी गोठा मालकास दोन तासात गोठा हलविण्याचा सूचना केली. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला. गोठा मालकाने गोठा हलविण्यास सुरुवात देखील केली.

गवळी वाडा येथील अभ्यासिकेची मुंढे यांनी पाहणी केली, त्यावेळी येथे एका कुटुंबाचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले. येथील सर्व संसार उपयोगी वस्तूचा पंचनामा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान आयुक्त मुंढे यांनी केलेल्या धडकेबाज कारवाईचे सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. नाशिकरोड विभागात लेखी १२७ आणि तोंडी १५ आशा एकूण १४२ तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, उद्यान, अतिक्रमणे, सार्वजनिक स्वच्छता , पथदीप आदींचा समावेश आहे.