Sat, Apr 20, 2019 10:07होमपेज › Nashik › कल्चरायण : आले नानाजीच्या मना...

कल्चरायण : आले नानाजीच्या मना...

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 10 2018 11:23PMसुदीप गुजराथी

माणसात शंभर गुण चांगले असले, तरी त्यांना खरेपणाचे कोंदण नसल्यास त्यांची झळाळी हवी तेवढी राहत नाही आणि अशा माणसांपासून दांभिकतेचा दर्प येऊ लागतो. अभिनेते नाना पाटेकर यांच्याबाबतही अशीच काहीशी भावना बळावणे दुर्दैवी म्हणावे लागेल. विलक्षण ताकदीचा अभिनेता आणि संवेदनशील माणूस अशी पाटेकर यांची सर्वत्र प्रतिमा असली, तरी तिचे भंजन खुद्द त्यांच्याकडूनच होत असेल तर त्यांच्या चाहत्यांना मनस्वी दु:ख होणे स्वाभाविक आहे. कथनी आणि करणी यातले अंतर वाढत गेल्यास माणसाच्या चेहर्‍याऐवजी मुखवटे दृष्टीस पडू लागतात. लोक भलेही मुखवट्यांनाच अस्सल समजत असले, तरी कधी ना कधी ते गळून पडतातच. गेल्या आठवड्यात आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशिकमध्ये येऊन गेलेल्या पाटेकर यांच्याबाबतही असेच काहीसे म्हणावे लागेल. ‘चित्रपट प्रमोशन वगैरे भानगडी मला आवडत नाहीत’ असे एरवी मुलाखतींतून सांगणारे पाटेकर स्वत:च्या चित्रपटासाठी गावोगावी फिरू लागतात, तेव्हा त्यांना त्याविषयी पत्रकारांकडून प्रश्‍न विचारले जाणे स्वाभाविक असते. अशा वेळी ‘आपले तेव्हाचे मत चुकीचे होते’ असे कबूल करीत वा ‘कालमानाप्रमाणे बदलावे लागते’ अशी अपरिहार्यता व्यक्‍त करीत पाटेकर यांनी वेळ मारून नेली असती, तर कोणाला काही वाटण्याचे कारण नव्हते. ‘एखाद्या विषयावर मी दोन वेगवेगळी मते मांडली असतील, तर त्यांपैकी माझे सर्वांत नवे मत विचारात घ्यावे’ असे महात्मा गांधींनीही सांगून ठेवले आहे. माणसाची भूमिका कालौघात बदलू शकते, असे त्यांचे म्हणणे होते; पण त्याऐवजी आपण सिनेमाचे प्रमोशन नव्हे, तर सामाजिक प्रश्‍नांवर बोलण्यासाठी गावोगावी हिंडतो आहोत, अशी मखलाशी जेव्हा पाटेकर करतात, तेव्हा त्यासाठी ‘ताकाला जाऊन भांडे लपवणे’ ही मराठीतील उक्‍ती समर्पक ठरते. नेमका चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तोंडावरच नानांना सामाजिक प्रश्‍नांवर बोलण्यासाठी गावोगावचे दौरे का करावेसे वाटतात, हा प्रश्‍न पडतो आणि स्वत:ला खरे ठरविण्यासाठी योजलेली ही क्लृप्‍ती आहे, हेही लक्षात येऊन जाते. त्यातूनच मग सध्याचे वातावरण कसे गलिच्छ आहे, आधीच्या सरकारने कशी लोकांबद्दल सहानुभूती दाखवली नाही, राजकारणी स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी तरुणांचा कसा वापर करून घेतात, बेरोजगारीने युवकांना कसे नैराश्य आले आहे वगैरे गोष्टी ओठांवर येऊ लागतात. खरे तर प्रचंड मेहनतीने साकारलेली एखादी कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी कलावंतांनी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात काही गैर नाही. आपली पोच आणि आवाका माहीत असलेले अन्य कलावंत आपण चित्रपटाचे प्रमोशन करीत आहोत आणि ते चित्रपटासाठी महत्त्वाचे आहे, हे खुलेपणाने सांगत असतात; पण नाना पाटेकर हे अवतारी पुरुष असल्याने मर्त्य मानवांच्या या काही गोष्टी त्यांना मान्य नसाव्यात. त्यातूनच मग पुढची गोची झालेली दिसते. प्रमोशन नव्हे, ही सामाजिक प्रश्‍नांबद्दलची कळकळ आहे, असे सांगणार्‍या पाटेकर यांचा आपल्या एका चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना ‘या चित्रपटाबद्दल बोला’ अशी सूचना देतानाचा व्हिडिओ यू ट्यूबवर उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी तो जरूर पाहावा. 

तीन वर्षांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव’ स्वीकारण्याच्या निमित्ताने नाना दोनदा नाशिकला येऊन गेले. त्यांचा ‘नटसम्राट’ नुकताच प्रदर्शित झाला असल्याने तेव्हा या सिनेमाची संपूर्ण टीम नाशिकमध्ये दाखल झाली होती. यानिमित्त कुसुमाग्रज स्मारकात मोठा कार्यक्रमही झाला होता. तेव्हाही पत्नी निलूला (नीलकांती पाटेकर) ‘कसे लिहिलेय’ असे विचारत-विचारत कुसुमाग्रजांनी ‘नटसम्राट’ नाटकाचा एकेक परिच्छेद लिहिला, असा भलामोठा पतंग नानांनी नाशिकचा आकाशात सोडला होता. ‘नटसम्राट’ लिहिले गेले तेव्हा अवघ्या तेरा-चौदा वर्षांच्या असलेल्या नीलकांती यांच्याकडून तात्यासाहेबांनी कोणते सल्ले घेतले असतील, हे कोडे नाशिककरांना अद्यापही सुटलेले नाही!
एरवी सार्‍यांच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यासाठी बाह्या सरसावणार्‍या नानांनी ‘पद्मावत’बाबत मात्र नेमकी उलट भूमिका घेतली होती. ‘चित्रपटात चुकीचे दाखवले तर लोक चिडणारच, माझ्या एकाही चित्रपटाला लोकांनी विरोध का केला नाही’ असा प्रारंभी बिनतोड वाटणारा सवाल तेव्हा पाटेकर पत्रकारांना करीत होते. सुरुवातीला प्रखर व हिंसक विरोध केल्यानंतर या चित्रपटात आक्षेपार्ह असे काहीच नाही, हे लक्षात येऊन करणी सेनेच्या एका गटानेही या चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला. मात्र, पाटेकर यांचा ‘पद्मावत’वरचा (की भन्साळींवरचा?) राग नाशिकला येईपर्यंत कायम होता. त्यामुळे त्यावरून आणि ‘अय्यारी’वरून प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी पत्रकारांची उलटतपासणी घेत पत्रपरिषद गुंडाळली. आपला कार्यभाग साधण्यासाठी पत्रकार परिषद बोलवायची आणि त्यात पत्रकारांचाच पाणउतारा करायचा ही किमया महाराष्ट्रात फक्‍त दोनच व्यक्‍तींना अवगत आहे- एक नाना पाटेकर आणि दुसरे राज ठाकरे! सांप्रतच्या बर्‍याच पत्रकारांची अवस्थाही ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशीच असली, तरी त्यावरून त्यांच्यावर कारण-विनाकारण डाफरणे, हेही संयुक्‍तिक नाही. एखादी गोष्ट सौम्य, संयमी भाषेतही सांगता येते. पत्रकारांनी हव्या त्या वेळी पत्रपरिषदांना यावे, कलावंतांकडून त्यांच्याच कौतुकाच्या आरत्या ऐकाव्यात आणि अडचणीचे वाटणारे प्रश्‍नही विचारू नयेत, अशी अपेक्षा करणे हे आत्मकेंद्रित मानसिकतेचे लक्षण आहे.

नाना पाटेकर यांचा अभिनय बिनतोड आहे, त्यांची सामाजिक जाणीव इतरांना अंतर्मुख करणारी आहे, ‘नाम’च्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी केलेले कार्य, सीमेवर लढणार्‍या जवानांप्रति त्यांचे असलेले प्रेम त्यांच्यातील माणुसकीची साक्ष देणारेच आहे. अशा उत्तुंग व्यक्‍तिमत्त्वाने असल्या लहानसहान गोष्टींवरून स्वतःचा आब घालवून घेणे बरे नाही, असे मनापासून वाटते. बाकी पुढे (नेहमीप्रमाणे) नानांची मर्जी!