Thu, Nov 15, 2018 09:54होमपेज › Nashik › बेशिस्त पोलीस, शासकीय वाहनचालकांवर कारवाई

बेशिस्त पोलीस, शासकीय वाहनचालकांवर कारवाई

Published On: Mar 01 2018 11:03PM | Last Updated: Mar 01 2018 10:49PMनाशिक : प्रतिनिधी

केटीएचएम महाविद्यालयाकडून टिळकवाडी सिग्नलच्या दिशेने वाहनांना येण्यास बंदी असतानाही एकेरी मार्गावरून उलट दिशेने वाहने चालवणार्‍यांवर शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी वाहतूक नियम मोडणार्‍या पोलिसांसह शासकीय वाहनांवरील चालक आणि सर्वसामान्य नागरिकांनाही या कारवाईला सामोरे जावे लागले.
यावेळी वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही घडले. मात्र, वाहतूक पोलिसांनी सर्वांवर कारवाई करीत वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले. 
शहर वाहतूक शाखेतर्फे सिद्धिविनायक रुग्णालयाकडून जुनी पंडित कॉलनी मार्गे टिळकवाडी सिग्नलला जाण्यासाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार वाहन चालकांना टिळकवाडी सिग्नलकडून सिद्धीविनायक रुग्णालयाकडे जाता येऊ शकते, मात्र उलट दिशेने येऊ शकत नाही. शहर वाहतूक शाखेतर्फे वारंवार या निर्णयात बदल केल्याने वाहनचालकांमध्येही गोंधळसदृष परिस्थिती आहे. दरम्यान, जनजागृती करूनही वाहन चालक एकेरी वाहतूकीचा नियम मोडत असल्याने गुरुवारी (दि.1) सकाळी 10 ते दुपारी 1  या वेळेत वाहतूक शाखेच्या पथकाने एकेरी वाहतुकीचा नियम मोडणार्‍या चालकांविरोधात कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे नियमित या मार्गाचा वापर करून वाहतूक नियम मोडणार्‍या वाहन चालकांची धांदल उडाली. इच्छितस्थळी जाण्यासाठी उशीर होत असल्याने काही वाहनचालकांनी वादविवाद न करताच दंड भरला. तर अनेकांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत दंड भरण्यास टाळाटाळ केली. मात्र पोलिसांनी त्यांच्याकडूनही दंड वसुल केला. या कारवाई दरम्यान (एमएच 15 एए 207) क्रमांकाचे शहर पोलिसांचे वाहन, गुन्हे शाखेच्या अधिकार्‍याचे शासकीय वाहन, शहर पोलिसांच्या दुचाकी वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा सर्व दंड वाहनचालकांकडून 
वसूल करण्यात आला. या ठिकाणी 40हून अधिक चालकांवर कारवाई करण्यात आली.