Wed, Mar 20, 2019 08:35होमपेज › Nashik › छगन भुजबळांवरील अन्यायाच्या निषेधार्थ ‘अन्याय पे चर्चा’ 

छगन भुजबळांवरील अन्यायाच्या निषेधार्थ ‘अन्याय पे चर्चा’ 

Published On: Jan 23 2018 3:09PM | Last Updated: Jan 23 2018 3:09PMपंचवटी : वार्ताहर

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत ‘अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत लवकरच ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यात तसेच शहरातील प्रभागांमध्ये भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ ‘अन्याय पे चर्चा’ हा अभिनव कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर ‘अन्याय पे महाचर्चा’ हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. अशी माहिती भुजबळ समर्थक समन्वय समितीचे समन्वयक दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी दिली आहे.

भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिक शहरात नुकतीच सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांची बैठक संपन्न झाली. याबैठकीत भुजबळांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भुजबळ समर्थक जोडो अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांनी केली आहे. त्यानंतर आता या अभियानांतर्गत छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ प्रत्येक खेड्या- पाड्यात व शहरातील गल्ली गल्लीत भुजबळ समर्थकांच्या घरी चहापाण्यासाठी नागरिकांना बोलवून ‘अन्याय पे चर्चा’ हा अभिनव कार्यक्रम राबवला जाणार आहे.

 या कार्यक्रमाअंतर्गत चर्चेत सहभागी होणारे कार्यकर्ते, आयोजक तसेच नागरिक यांची माहिती संकलित  केली जाणार आहे. अन्याय पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्यांना या चर्चेसाठी कार्यक्रम दिला जाणार आहे. या माध्यमातून होणाऱ्या चर्चेअंतर्गत भुजबळ समर्थकांची मते जाणून घेतली जाणार आहे. त्यांच्याकडून आलेल्या सूचना लक्षात घेऊन मग नाशिक येथे जिल्हास्तरीय ‘अन्याय पे महाचर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महाचर्चेत विविध विचारवंत, विधीज्ञ, राजकीय विश्लेषक व समाजसेवक यांचा सहभाग घेतला जाणार आहे. आजपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती खैरे आणि बाळासाहेब कर्डक दिली.