Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Nashik › रासायनिक तपासणीचा अहवाल द्या

रासायनिक तपासणीचा अहवाल द्या

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 12:23AMपिंपळगाव बसवंत : वार्ताहर

रासायनिक तपासणीचा अहवाल द्राक्ष उत्पादन शेतकर्‍यांना मिळत नसल्याने द्राक्ष निर्यातदार शेतकरी हतबल झाले आहेत. रासायनिक अंशाचे प्रमाण अधिक असल्याची बतावणी करत व्यापारी कमी भावाने द्राक्ष खरेदी करतात. व्यापार्‍यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्‍यांना हा तपासणी अहवाल देण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शनिवारी (दि. 17) निफाड येथील हल्लाबोल मोर्चासाठी खासदार सुळे आल्या होत्या. दिंडोरी येथे जात असताना येथील शेतकर्‍यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जि. प. सदस्या मंदाकिनी बनकर, ग्रा. पं. सदस्य गणेश बनकर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात तीस हजारांहून अधिक द्राक्ष निर्यातदार शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांची द्राक्ष परदेशात जातात. युरोपमध्ये द्राक्षाला अधिक भाव मिळत असल्याने आपली द्राक्षे युरोपमध्येच जावीत, अशी प्रत्येक शेतकर्‍याची इच्छा असते. त्यासाठी द्राक्षाचा अंश दर कमीत कमी असणे गरजेचा आहे. शेतकर्‍याला द्राक्षाचा अंश तपासणीचा खर्च आठ हजार रुपये इतका येतो.

मात्र, लॅब प्रशासन तपासणीचा अहवाल शेतकर्‍यांना न पाठविता निर्यातदार व्यापार्‍यांना पाठवतात. यामुळे व्यापारी सांगेल तसा अंश दर शेतकर्‍यांना मान्य करावा लागतो. याचाच फायदा व्यापारी उठवतात. द्राक्षांमध्ये अंशदर अधिक आहे. तुमची द्राक्ष युरोपला जाऊ शकत नाही. युरोपऐवजी इतर देशात तुमची द्राक्ष पाठवावी लागतील, अशी बतावणी करत व्यापारी द्राक्षाचे भाव पाडतात. यामुळे दरवर्षी व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे द्राक्षांची रासायनिक अवशेष तपासणी अहवालाचा संदेश शेतकर्‍यांना त्यांच्या मोबाइलवर, व्हॉटसअ‍ॅपवर अथवा इ-मेलवर मिळावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. याबाबत शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे खा. सुळे म्हणाल्या. यावेळी शेतकरी अनंत मोरे, संदीप उगले, कल्पेश उगले, बापू बस्ते, संतोष पगार, सचिन पगार, पंकज ताकाटे, गणेश दाते, गोविंद काजळे, उद्धव काजळे, बापू शंखपाळ, भूषण पगार, विष्णू पगार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.