Mon, Apr 22, 2019 12:39होमपेज › Nashik › चांदवडजवळ चंदन तस्करांची टोळी गजाआड

चांदवडजवळ चंदन तस्करांची टोळी गजाआड

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:44PM

बुकमार्क करा
चांदवड : वार्ताहर

मालेगाव येथून अवैधरीत्या चंदनाची तस्करी करीत असलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात नाशिक विशेष गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या तिघांकडून तीन लाख 68 हजार 600 रुपये किमतीचे 194 किलो चंदन, सात लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण 10 लाख 68 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल नाशिक विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिन्ही संशयित मालेगाव येथून गाडीतील चंदन नाशिकमार्गे सिल्वासाला घेऊन जात असल्याचे पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी सांगितले.

मालेगाव येथून काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना सूत्रांनी दिली होती. या चंदन तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल संपत आहेर, कुणाल मराठे, पोलीस नाईक चेतन संवत्सरकर, विजय कोरडे, किरण गांगुर्डे काही महिन्यांपासून चंदन तस्करी करणार्‍या टोळीच्या मागावर होते. मालेगाव येथून शुक्रवारी (दि.5) पहाटे नाशिकमार्गे सिल्वासा येथे चंदन घेऊन जाणार असल्याची माहिती दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चौधरी व कर्मचार्‍यांनी शुक्रवारी पहाटेच्या वेळी चांदवड हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ टोल नाक्यावर सापळा रचला होता. याच दरम्यान मालेगावकडून येणार्‍या सफेद रंगाच्या व्हर्ना कारचा (एमएच 02 सीएम 4501) पोलिसांना संशय आला. त्यावेळी पोलिसांनी गाडीतील तिघांची चौकशी करीत गाडीची झडती घेतली असता, गाडीत बेकायदेशीर चंदन आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी गाडीतील निशाल मारुती पवार (27, रा. नीळगव्हाण ता. मालेगाव), तात्या काळू पवार (20, रा. नीळगव्हाण, ता. मालेगाव) व राकेश मधुकर वाघ (26, रा. जाजूवाडी, मालेगाव) या तिघांना ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे. गाडीत असलेल्या चंदनाचे मोजमाप केले असता, ते 194 किलो भरले. या संपूर्ण कारवाईत तीन लाख 68 हजार 600 रुपये किमतीचे 194 किलो चंदन व सात लाख रुपयांची गाडी असा एकूण 10 लाख 68 हजार 600 रुपये रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे तपास करीत आहेत.