होमपेज › Nashik › जातपडताळणीचे चौदाशे प्रकरणे निकाली

जातपडताळणीचे चौदाशे प्रकरणे निकाली

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 11:12PMनाशिक : प्रतिनिधी

यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमाती प्रवर्गातील 1 हजार 373 शैक्षणिक प्रकरणे निकाली काढण्यात एसटी प्रमाणपत्र तपासणी समितीला यश आले आहे. त्यामुळे नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रमाणपत्र समितीच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी एसटी प्रमाणपत्र तपासणी समितीकडे 3 हजार 261 विद्यार्थ्यांनी जातपडताळणीचे अर्ज सादर केले होते. यामध्ये वैद्यकीय विभागातून 78, अभियांत्रिकी विभागातून 212, व्यावसायिक विभागातून 105 तर इतर शैक्षणिक विभागातून 2866 प्रकरणांचा समावेश होता. समितीने वैद्यकीय प्रकरणांना प्राधान्य देऊन सर्वच प्रकरणे वेळेत निकाली काढले तर  अभियांत्रिकी विभागाचे 207, व्यावसायिक विभागाचे 74  आणि इतर शैक्षणिक विभागाचे 1 हजार 14 प्रकरणांचा निपटरा समितीने केला आहे. 

अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे सध्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकरणे निकाली काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कागदोपत्री पुरावे, शपथपत्रे, इतर आवश्यक दस्तावेज सादर न केलेल्या अर्जदारांना त्रुटीचे पत्र आणि एसएमएस पाठविण्यात आले आहे.  प्रलंबित प्रकरणांसाठी दररोज सुनावणी घेतली जात आहे. सुनावणीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करवून घेऊन प्रकरण निकाली काढण्यावर समितीकडून भर देण्यात येत आहे. 

आजमितीला समिती स्तरावर 1 हजार 879 शैक्षणिक प्रकरणे प्रलंबित आहे. यामध्ये अभियांत्रिकी शाखेचे 5, व्यावसायिक शाखेचे 22 तर इतर शैक्षणिक शाखेचे 1 हजार 852 प्रकरणांचा समावेश आहे. अभियांत्रिकी शाखेनंतर इतर प्रकरणाचा निपटारा केला जाणार आहे. तरी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.