Wed, Nov 21, 2018 15:22होमपेज › Nashik › पुरामध्ये वाहून गेल्याने सुरगाण्यात शेतकर्‍याचा मृत्यू

पुरामध्ये वाहून गेल्याने सुरगाण्यात शेतकर्‍याचा मृत्यू

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 1:31AMसुरगाणा : वार्ताहर

खुंटविहीर पैकी मोहपाडा येथील शेतकर्‍या पुरात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, सासुरवाडीला आलेले दोघेजण  नशिब बलवत्तर म्हणून वाचले. तालुक्यात तसेच खुंटविहीर, पिंपळसोंड, उंबरपाडा(पि), रानविहीर, उदालदरी या भागात मुसळधार पाऊस झाला. एक ते दीड वाजेच्या  दरम्यान भितचोंड या नाल्याला दाडींचीबारी या तीव्र डोंगर उतारावरील पाण्याचा पुर आल्याने खुंटविहीर पैकी मोहपाडा येथील शेतकरी मोतीराम सखाराम धुम (45) हा खुंटविहीर जवळील भितचोंड नाल्याला आलेल्या गुडघाभर पाण्यातून मोहपाडा येथे जाण्यासाठी उतरत असतांना अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंदा झिरवाळ यांनी शिक्षक रतन चौधरी यांना कळविली. चौधरी यांनी तातडीने तहसीलदार दादासाहेब गिते, सहायक पोलीस निरीक्षक माने यांना कळविली.

गिते यांनी तातडीने तत्काळ दखल घेऊन पोलिसांना पाचारण करीत रेस्क्यू टिमसह खुंटविहीर गाठले. जोरदार पाऊस सुरु असतांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील दोन युवक मोहपाडा येथे दुचाकीवरून सासुरवाडीला येत असता त्यांनाही पाईपच्या मोरीवरून जाणार्‍या पुराचा अंदाज न आल्याने ते पुरात वाहून गेले.पैकी एकजण नाल्यातील एका दगडाच्या टोकाला कसेबसे घट्ट धरून पुराचे पाणी ओसरेपर्यंत तग धरून होता. त्यामुळे तो वाचला तर दुसरा दुचाकीस्वार सिमेंट बंधार्‍याच्या पाण्यात वाहून गेला. थोडेफार पोहता येत असल्याने गटांगळ्या खात बंधार्‍याच्या काठावर जेमतेम येऊन पोहचला.

दुचाकी खोल पाण्यातून बाहेर काढण्यात आली. तर मोतीराम धूम यास ग्रामस्थ यशवंत पालवी, गोपाळ चौधरी, भास्कर बोरसे, राहुल पाडवी, मुरलीधर वाहुट, सादुराम धुम यांनी भरपावसात खोल पाण्यात शोध मोहिम राबविली. याच फरशीपुलाच्या खाली जलशिवार योजनेचा सिमेंट बंधारा आहे. यामधून दिड तासाने पुराचे पाणी ओसरल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तहसीलदार दादासाहेब  गिते, नायब तहसीलदार महेंद्र  खैरनार, तलाठी जयवंत कांबळे, केदार भदाणे, हेमंत पोटिंदे, सुधीर सोनवणे यांनी  घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र दिवे, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष माने, हेमंत भालेराव, रमेश निकम, नाना  जोपळे, केशव पवार यांनी मृतदेह सुरगाणा येथे आणला. धुम यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार  आहे.