Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Nashik › राजकीय भिंती दूर सारून नेत्यांच्या रंगल्या गप्पा

राजकीय भिंती दूर सारून नेत्यांच्या रंगल्या गप्पा

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 10:54PMनाशिक : प्रतिनिधी 

 शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानावेळी मतदान केंद्राबाहेर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते तळ ठोकून होते. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदानावर बारीक लक्ष ठेवले होते. यावेळी समोरासमोर आल्यावर राजकीय मतभेद दूर सारून राजकीय प्रतिनिधींनी एकमेकांशी हस्तांदोलन करत गप्पा देखील ठोकल्या. मात्र, कॅमेर्‍यामध्ये हे दृश्य क्‍लिक होताच विजय आपल्याच उमेदवाराचा होईल हे सांगायला नेते मंडळी  विसरली नाही.

मतदान केंद्राबाहेर उमेदवारांनी त्यांचे बूथ लावले होते. या ठिकाणी त्यांचे नातेवाइक देखील उपस्थित होते. उमेदवार स्वत: शिक्षक मतदारांचे नमस्कार करून स्वागत करत होते. सकाळपासूनच राजकीय नेत्यांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती. भाजपाकडून अनिकेत पाटील यांच्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, वसंत गिते, विजय साने यांनी मोर्चा सांभाळला होता. दुपारी आमदार प्रा.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, महापालिका स्थायी सभापती हिमगौरी आडके यांनी मतदान केंद्राला भेद देत मतदानाची माहिती घेतली. तर शिवसेनेकडून पक्षाचे पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचे बंधू आमदार नरेंद्र दराडे यांनी दिवसभर मतदान केंद्रावर मुक्काम ठोकला होता. त्यांच्या सोबत माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख सचिन मराठे आणि महेश बडवे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते. भाजपाचे वसंत गिते आणि शिवसेनेचे विनायक पांडे यांची मैत्री सर्वश्रूत आहे. मतदान केंद्राबाहेर या दोघांनी राजकीय भिंती दूर सारत गप्पा मारल्या. राष्ट्रवादीकडून माजी शहरप्रमुख अर्जुन टिळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, नाना महालेंनी बेडसे यांच्या बूथवर तळ ठोकला होता. यावेळी समोरा समोर आल्यावर मात्र, राजकीय मतभेद काही क्षणासाठी दूर ठेवत राजकीय नेत्यांनी अगदी एकमेकांना आलिंगन देत हस्तांदोलन केले. तसेच, एकमेकांच्या गळ्यात हात टाकून राजकीय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देखील दिल्याचे चित्र पहायला मिळाले.