Tue, Aug 20, 2019 05:00होमपेज › Nashik › मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकचा विचार : दानवे

मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकचा विचार : दानवे

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:10PM
नाशिक : प्रतिनिधी

येत्या मे महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात नाशिकला स्थान देण्याबाबत विचार केला जाईल,असे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी नाशिककरांना दिलासा देण्यात प्रयत्न केला. मात्र, मंत्रीपदाची लॉटरी महिला अथवा पुरुष आमदारांपैकी कोणाला लागेल, याबाबत विचारले असता त्यांनी स्मित हास्य करत सोयीस्कर मौन बाळगणे पसंत केले.

रावसाहेब दानवे नाशिक दौर्‍यावर आले असता सोमवारी (दि.23) भाजपाच्या वसंतस्मृती पक्ष कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी  विविध मुद्यांवर भाष्य केले. भाजपा व शिवसेना युतीबाबत विचारले असता सुधीर मुनगंटीवार यांना युतीसाठी शिवसेनेशी चर्चा करण्याचे अधिकार दिले आहेत, त्यांनी बोलणीसाठी मातोश्रीकडे वेळ मागितला या बाबत कोणतीही माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, युती होणार की नाही हे वेळच ठरवेल, असे त्यांनी सांगितले. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सेनेने उमेदवारीची घोषणा केली असली तरी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. भाजपाकडून कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय संसदीय मंडळात होईल. त्यानंतर हा प्रस्ताव दिल्लीतील के्ंरदीय मंडळाकडे पाठविला जाईल व अंतिम निर्णय घेतला जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करु असे सांगत त्यांनी निवडणुकीबाबत अधिक बोलण्याचे टाळले. कोकणातील नाणार प्रकल्पाची जागा ठरलेली नाही तरी काही पक्ष एकत्र येऊन त्यास विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, संघटन मंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

‘एक बूथ, 25 यूथ’ची रणनीती

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकी पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी भाजपाने 80 हजार बूथप्रमुख नेमले आहेत. ‘एक बूथ, 25 यूथ’ ही योजना पक्षाने राबवली असून, पेज प्रमुख देखील नेमले आहेत. प्रत्येक यूथ 25 नागरिकांना भाजपाशी जोडेल. पक्षाने केलेली कामे, योजना लोकापर्यंत पोहचविल्या जातील. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाला चार जागी यश मिळाले. भाजपावर विश्‍वास दर्शवत जनतेने दोन्ही काँग्रेस व शिवसेनेला नाकारले, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

आमदार हिरे यांनी फिरवली पाठ

नाशिक : प्रतिनिधी 

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नाशिक दौर्‍याकडे आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी पाठ फिरवली. आ. हिरे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील ही चर्चा आता नवीन नाही. दस्तुरखुद्द दानवे यांच्या दौर्‍यात आ. हिरे अनुपस्थित राहिल्याने पक्षाच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात त्यांच्या बंडखोरीची उघड चर्चा रंगली होती. तसेच माजी आमदार माणिक कोकाटे आणि वसंत गिते यांनीही शेवटच्या क्षणी हजेरी लावत केवळ औपचारिकता पार पाडली, अशीही दबक्या आवाजात चर्चा होती. 

एरवी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिक दौर्‍यात आ. डॉ. अपूर्व हिरे झाडून हजर राहत. डॉ. हिरे हे तर पालकमंत्र्यांची सावली, अशी त्यांची ओळख बनली होती. मात्र, हिरे सध्या पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमांपासून स्वतःला दोन हात दूर ठेवत आहे. रविवारी (दि.22) माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी मालेगावमध्ये सहविचार सभा घेत नाराजी दूर करा अन्यथा वेगळा विचार करू, असा इशारा भाजपा नेतृत्वाला दिला. यावेळी अद्वैय हिरे व डॉ.अपूर्व हिरे हेदेखील व्यासपीठावर होते. हिरे परिवार पुन्हा एकदा ‘मी राष्ट्रवादी’ हे गीत गाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. तर, नाशिकमध्ये वसंत गिते हेदेखील भाजपात नाराज असल्याचे बोलले जाते. गिते यांचे चिरंजीव प्रथमेश हे उपमहापौरपदी विराजमान आहेत. त्यामुळे भाजपाविरोधात बंडखोरीचे धाडस त्यांनी टाळले आहे.

उपमहापौरपदाची मुदत संपुष्टात येताच गिते भाजपाला सोडचिठ्ठी देतील, असे त्यांच्याच समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्याची प्रचिती प्रदेशाध्यक्ष    रावसाहेब दानवे यांच्या दौर्‍यातही पाहायला मिळाली.  रावसाहेब दानवे यांनी पक्ष कार्यालयात भाजपा कार्यालयात बैठक घेतली. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्‍त केली. पालकमंत्री नाशिककडे वेळ देत नाही. कार्यकत्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही, असे गार्‍हाणे यावेळी मांडण्यात आले. तसेच, पक्षाची सत्ता असूनही विविध समित्या, कार्यकारी दंडाधिकारी पदे रिक्‍त असून, त्यावर निष्ठावंतांची वर्णी लावावी, असे साकडे दानवे यांना घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना शांत करत पदांवर नियुक्त्यांसाठी माझ्याकडे यादी पाठवा. मी स्वतः लक्ष घालतो, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

Tags : Nashik, MP Raosaheb Danve, cabinet expansion, nashik news,