Sun, May 26, 2019 21:47होमपेज › Nashik › घरफोड्या करणारी टोळी अखेर गजाआड

घरफोड्या करणारी टोळी अखेर गजाआड

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 01 2018 10:41PMनाशिक : प्रतिनिधी

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी सात वर्षे शिक्षा भोगल्यानंतर एकाने घरफोडी करणार्‍यांची टोळी बनवली.  तसेच ठिकठिकाणी घरफोड्या करणार्‍यासह त्याच्या जोडीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. हरिदास बाळू निसाळ असे म्होरक्याचे नाव असून, त्याच्यासह चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून घरफोडी व चोरीतील 83 मोबाइल, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा दोन लाख 71 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांनी खबर्‍यांकडून माहिती मिळवत संशयितांचा माग काढला. त्यात काही संशयित दिंडोरी तालुक्यात राहत असल्याची माहिती मिळाली होती. मंगळवारी (दि.31) रात्री सापळा रचून संशयित हरिदास बाळू निसाळ (27), गणेश बाळू निसाळ (19), कार्तिक नाना भोये (20), राजू सुदाम निसाळ (20, सर्व राहणार नाळेगाव, ता. दिंडोरी) यांना अटक केली तर श्रावण रामदास वाघमारे (25) हा फरार झाला आहे.  चौघा संशयितांची चौकशी केल्यानंतर त्यांनी पेठ, दिंडोरी, गिरणारे परिसरात घरफोड्या तसेच नाशिक शहरात दुचाकी चोरीची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, रवींद्र शिलावट, हवालदार प्रकाश तुपलोंढे, हनुमंत महाले, दीपक अहिरे, पुंडलीक राऊत, दत्‍तात्रय साबळे, गणेश वराडे, पोलीस नाईक वसंत खांडवी, अमोल घुगे, जालिंदर खराटे, योगिनी नाईक यांनी ही कामगिरी केली.