नाशिक : प्रतिनिधी
शहरात घरफोडी करणार्या दोघा संशयित चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून घरफोडीत लंपास केलेला सुमारे साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गणेश बाजीराव केदारे (रा. जिल्हा अकोला) आणि शंकर नागेश पुजारी अशी या दोघा संशयितांची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिटचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी हे घरफोडी करणार्या संशयितांचा शोध घेत होते. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा तपास करताना पोलीस हवालदार येवाजी महाले यांना संशयित गणेश केदारेची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अकोला जिल्ह्यातून गणेशला ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचा जोडिदार शंकर नागेश पुजारी याची माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचून मालेगाव स्टँड परिसरातून शंकरला ताब्यात घेतले. दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गंगापूर रोडवरील डिके नगर परिसरातील तुषार शालिग्राम पाटील यांच्या घरात 10 ते 11 मार्च 2018 दरम्यान, घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघा संशयितांकडून पाटील यांच्या घरात केलेल्या घरफोडीतील 14 तोळे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या दोघांनी शहरातील सरकारवाडा आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून 3 मोबाईल, 27 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा 4 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी बजावली.