Sun, Aug 25, 2019 23:25होमपेज › Nashik › पोळ्याला वाजतगाजत बैलांची मिरवणूक

पोळ्याला वाजतगाजत बैलांची मिरवणूक

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 10:39PMलासलगाव : वार्ताहर 

लासलगाव येेेथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सजवलेल्या बैलजोडीची मिरवणूक काढून शेतकर्‍यांनी गावात उत्साहात भर घातली. जागोजागी महिलांनी सर्जा-राजाला पुरणपोळीचा नैवेद्य भरवून औक्षण केले.

पोळ्यासाठी सकाळपासूनच मातीचे बैल खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी दिसून येत होती. तसेच, बैल सजवण्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांवर शेतकर्‍यांनी गर्दी केलेली होती. 

मातीचे बैल लहान मुलांसाठी खास आकर्षण होते. यामुळे परिसरातील नागरिक आपल्या लहान मुलांसह बाजारात आलेले होते. तसेच, शेतकर्‍यांनीही घरी बैलांना आंघोळ घालत खांद्यावर झूल घातली. नंतर वाजतगाजत मिरवणूक काढून गावात विधिवत पूजा करण्यात आली. बैलांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला. शिंगांना बेगड, फुगे बांधून गुलाल भडार्‍यांची उधळण बैलांवर करण्यात आली. वाद्यांच्या गजरात लासलगाव मेनरोडमधून मिरवणूक गेली

पोळा असल्याने सर्जा-राजाला शेतीकामातून विश्रांती देण्यात आली होती. शेतकर्‍यांनी आपल्या बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घातली. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावले. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली. गळ्यात चौरंगाच्या सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनींनी रांगोळ्या काढल्या होत्या. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत गेले. ‘अतिथी देवो भव’ म्हणत बैलांना घरी आणण्यात आले. घरातील सुवासिनींनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिले. त्यासोबत बैलांना गहू-ज्वारीचा घास भरवत औक्षण केले. लासलगावसह टाकळी (विंचूर) ब्राह्मणगाव, निमगाव वाकडा, कोटमगाव या भागात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.