Thu, May 23, 2019 14:39
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिक : तोतया आयपीएस अधिकारी गजाआड

नाशिक : तोतया आयपीएस अधिकारी गजाआड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सतत अपयशी ठरत असल्याने मुंबई येथील तरुणाने तोतया आयपीएस अधिकार्‍याचे सोंग घेत मुंबईसह नाशिकमधील हॉटेलचालक  आणि ओला कारचालकांना लाखो रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमित अंबिका सिंग (25, रा. मुलुंड, पश्‍चिम मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. नाशिकमधील सरकारवाडा आणि मुंबईनाका या दोन पोलीस ठाण्यांत अमितविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

जगनप्रसाद रामदिन मोरया (37, रा. ग्रँट रोड, मुंबई) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, 16 मार्चला संशयित अमित याने ऑनलाइन बुकिंगद्वारे ओला कार बुक केली. त्यानुसार जगनप्रसाद मोरया हे त्यांच्याकडील एमएच 01 सीजे 4744 क्रमांकाची कार घेऊन अमितकडे गेले. तेथे अमित सिंग आणि वसिम शकील सैयद या दोघांना घेऊन जगनप्रसाद नाशिकच्या दिशेने निघाले. यावेळी जगनप्रसाद यांना अमितने त्याची ओळख आयपीएस अधिकारी असल्याची करून दिली. अमितच्या कमरेला पिस्तूल लावलेले दिसत असल्याने जगनप्रसाद यांना ते खरे वाटले. तर दुसरी व्यक्ती वसिम हा अमितचा चालक असल्याचे सांगितले. सायंकाळी 6 वाजता नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी शहरातील एक्सिलन्सी इन हॉटेल बुक केले. येथे 18 मार्चपर्यंत मुक्काम केल्यानंतर येथून तिघेही बाहेर पडले. त्यावेळी जगनप्रसाद यांनी अमितला मुंबईला जाऊ, अशी विनंती केली. त्यावेळी अमित याने आपणास शिर्डीला जाऊन एक कोटी रुपये आणायचे आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी हॉटेल बदलून 18 ते 21 मार्चपर्यंत शहरातील एसएसके हॉटेलमध्ये मुक्काम केला. 21 मार्चला शिर्डीला गेल्यानंतर अमितने दोन खोके आणून गाडीच्या डिकीत ठेवले. या खोक्यांमध्ये पैसे आहे, असे त्यावेळी अमितने जगनप्रसादला सांगितले. मला समोरच्या व्यक्तीस 20 हजार रुपये द्यायचे आहे, आता खोक्यातून पैसे काढणे अवघड असल्याने तू तुझ्याकडील 10 हजार रुपये मला दे, नाशिकला गेल्यावर तुला तुझे पैसे परत करू, असे अमितने जगनप्रसादला सांगितले. त्यानुसार जगनप्रसाद यांनी अमितला 10 हजार रुपये दिले. त्यानंतर ते पुन्हा नाशिकला येत असताना जगनप्रसाद यांनी अमितकडे कार भाड्यासाठी लागणार्‍या पैशांची मागणी केली. त्यावेळी शिर्डीहून भेटलेले पैसे दुसर्‍याचे असून, आपल्यासाठी मॅडम पैसे आणणार आहेत, असे सांगून त्याने सिन्नरमधील पंचवटी हॉटेल येथे गाडी थांबविण्यास सांगितली. त्यावेळी जगनप्रसाद यांना अमितचा संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. त्यानंतर तिघेही पुन्हा नाशिकच्या एमराल्ड पार्क येथे थांबले. तेथेही अमितने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने जगनप्रसाद यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी अमितला ताब्यात घेत चौकशी केली असता तो आयपीएस अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हॉटेलचालकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात, तर कारचालक जगनप्रसादची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी अमितला अटक केली आहे. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags : nashik, nashik news, IPS, fake IPS officer, 


  •