Fri, May 29, 2020 09:20होमपेज › Nashik › शेतकरी संपाने व्यापार्‍यांची चांदी

शेतकरी संपाने व्यापार्‍यांची चांदी

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 11:17PMपंचवटी : वार्ताहर 

शेतकरी संपामुळे व्यापार्‍यांची चांगलीच चांदी होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे बाजार समितीत आवक झालेल्या शेतमालाला भाव दिला जात नसताना, दुसरीकडे सर्वसामान्यांना मात्र संप सुरू असल्याचे कारण दाखवत चढ्या दराने भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज असून, सर्वसामान्यांनाही महागाईचा फटका बसत आहे.  

शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम राज्यातील अनेक बाजार समित्यांवर दिसू लागला आहे. शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वी बराच भाजीपाला बाजार समित्यांमध्ये आणून विकल्याने आवक वाढल्याचे कारण देत व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या मालाला कमी भाव दिला. तर दुसरीकडे कमी भावात खरेदी केलेला भाजीपाला शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असल्याचे सांगत नागरिकांना चढ्या दराने विक्री केला जात असल्याचे चित्र आहे. नाशिक बाजार समितीमध्ये 1 जूननंतर शेतकर्‍यांकडील भाजीपाला कमी झाल्याने त्याची आवकदेखील कमी झाली. सध्या अवघी 30 ते 35 टक्के भाजीपाल्याची आवक बाजार समितीमध्ये सुरू असताना एकाही शेतकर्‍याच्या भाजीपाल्याला विक्रमी भाव मिळालेला नाही.

नेहमीपेक्षादेखील बरेच कमी दर मिळत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाविषयी नाराजी व्यक्‍त केली आहे. साहजिकच ज्यावेळी आवक कमी त्यावेळी भाजीपाल्याचे भाव कडाडतात तर आवक वाढताच दर कोसळतात हे गणित सर्वांना माहीत आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून आवक मोठ्या प्रमाणात कमी असूनदेखील शेतकर्‍यांच्या मालाला भाव का मिळत नाही, हे गणित कोणालाच उमगलेले नाही. 

सध्या स्थानिक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची आवक सुरू झाली आहे. तसेच अनेक व्यापारी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन माल खरेदी करीत असल्याने बाजार समितीमधील मालाला उठाव नसल्याने बाजारभाव कमी मिळत आहे. - अरुण काळे, सचिव, नाकृउबा समिती