Wed, Feb 20, 2019 20:54होमपेज › Nashik › शेतकऱ्यांची रक्‍कम हडप करणाऱ्या सचिवाचे निलंबन 

शेतकऱ्यांची रक्‍कम हडप करणाऱ्या सचिवाचे निलंबन 

Published On: Feb 09 2018 7:57PM | Last Updated: Feb 09 2018 7:57PMजळगाव बुद्रुक  : वार्ताहर

अस्मानी संकटाचा सामना करून परिस्थितीशी दोन हात करत असलेल्या शेतकऱ्यांचे 'सुलतानी' कारभार कंबरडेच मोडत असल्याचे उदाहरण नुकतेच नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथे समोर आले. मात्र, या शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याने व प्रसिद्धी माध्यमांनी साथ दिल्याने शेतकऱ्यांची रक्‍कम हडप करणाऱ्या सचिवाचे निलंबन करण्यात आले आहे. विविध कार्यकारी संस्थेचे सचिव विठ्ठल दिवटे यांना सहायक निबंधक कार्यालयाने तडकाफडकी निलंबन केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

येथील तात्यासाहेब घाडगे यांनी स्थानिक सोसायटी कडून ५ जून २०१२ रोजी खरीप कांद्यासाठी व त्यानंतर डाळींबासाठी असे १ लाख ५ हजार रुपये कर्ज घेतले व मुदतीत व्याजासह १ लाख ५२ हजार रुपये भरले. मात्र, या संस्थेचे सचिव विठ्ठल दिवटे यांनी ही रक्कम घाडगे यांच्या खात्यात न भरता ती रक्‍कम स्वतःसाठी खर्च केली.

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी ठरू अशी मनोमन इच्छा बाळगून असलेल्या घाडगे यांना आपण थकबाकीदार असल्याची माहिती मिळताच, त्यांनी तालुका स्तरीय व जिल्हा पातळीवर तक्रार करत दाद मागितली. त्यावर जिल्हा स्तरीय संबधित विभागाने घाडगे यांच्या तक्रारीची दखल घेत चिंचविहीर सोसायटीचे सचिव विठ्ठल दिवटे यांना निलंबित केले. तत्पूर्वी घाडगे यांची रक्कम दिवटे यांच्याकडून वसूल करत तिचा भरणा करण्यात आला आहे. सचिव दिवटे यांनी याच चिंचविहीर गावात अलीकडेच पाच एकर जमीन घेतल्याची चर्चा या रंगली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली रक्कम भरणा केलेली असतानाही ते थकबाकीदार दिसत असल्याच्या घटना नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत उघडकीस आल्या आहेत. मात्र स्थानिक किंवा आज ना उद्या सचिव ही रक्कम खात्यावर जमा करतील. या भरवश्यावर तक्रारी दाखल होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.