Mon, Jul 22, 2019 02:39होमपेज › Nashik › धुळ्याच्या ग.स. बँकेत ६ कोटींचा गैरव्यवहार

धुळ्याच्या ग.स. बँकेत ६ कोटींचा गैरव्यवहार

Published On: Sep 13 2018 1:46AM | Last Updated: Sep 13 2018 12:27AMधुळे : प्रतिनिधी

धुळे आणि नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी बँकेतील कर्जावरील व्याज वसूल नसतांना खोट्या नोंदी करून रिझर्व्ह बँकेची परवानगी न घेता एटीएमचा व्यवहार करून सुमारे 6 कोटी 53 लाख 83 हजार 205 रुपयांचा गैरव्यवहार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी बँकेच्या चेअरमनसह 46 संचालक तसेच, व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ग. स. बँकेत हा गैरप्रकार घडला आहे. या बँकेच्या लेखापरीक्षणाबाबत तक्रारी अर्ज आल्याने हा प्रकार उघड झाला आहे. बँकेच्या आजी व माजी संचालकांसह व्यवस्थापकाने आपापसात संगनमत करून हा गैरप्रकार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बँकेच्या या नोंदीमधे कर्जावरील व्याज 4 कोटी 44 लाख 53 हजार 205 रूपये वसूल झालेले नसतांना ती रक्कम उत्पन्न म्हणून मिळाली असल्याचे दाखविण्यात आले. तसेच, ही रक्‍कम कर्जदारांच्या नावे जमाखर्च केला. प्रत्यक्षात उत्पन्‍न मिळाल्याचे भासवून दिशाभूल करणारे खोटे आर्थिक पत्रके तयार केली. ही पत्रके बँकेच्या सर्वसाधारण सभेत मांडून सभासदांची दिशाभूल करून मंजूर करून घेत त्यांची फसवणूक केली. यासोबतच ही आर्थिक पत्रके रिझर्व्ह बँक, सहकार खाते तसेच, सभासदांसमोर ठेवून त्यांचीदेखील फसवणूक केली.

ग. स. बँकेच्या व्यवहारात केवळ अनियमितता आहे. पण केवळ राजकीय दबाव आणून बँक आणि संचालकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. या बँकेतील अनियमिततेसंदर्भात लेखा परीक्षकाने 23 मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर शहर पोलीस तसेच पोलीस अधीक्षक यांनी सविस्तर चौकशी केली. यासाठी कायदेशीर मतदेखील मागवले. यानंतर ही फाईल बंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता बँकेने सर्व व्यवहार हे धनादेशाद्वारे केले आहे. त्यामुळे यात कोणताही गैरप्रकार नाही.
    - चंद्रकांत देसले, चेअरमन, ग. स. बँक