Tue, Feb 19, 2019 11:02होमपेज › Nashik › बँकेच्या रोखपालाने लाटले  खातेदारांचे अडीच कोटी

बँकेच्या रोखपालाने लाटले  खातेदारांचे अडीच कोटी

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Dec 31 2017 11:12PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

खातेदारांनी खात्यात पैसे भरल्यानंतर त्यांची नोंद केल्यानंतर बँकेच्या तिजोरीत पैसे न भरताच स्वत:च्या फायद्यासाठी एका रोखपालाने पैसे वापरल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गणेश तुकाराम इनकर (32, रा. क्रांतीनगर, पंचवटी, मूळ रा. सिंधखेड राजा, जि. बुलढाणा) या संशयिताविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गणेश इनकर हा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑप लिमिटेड बँकेत लिपीक आणि रोखपाल म्हणून कार्यरत होता. 19 मे 2015 ते 26 मे 2016 या वर्षभराच्या कालावधीत रोखपाल असलेल्या गणेश याच्या कार्यकाळात बँकेच्या 37 खातेदारांनी त्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरले. पैसे भरल्याची नोंद गणेश याने केली, मात्र खातेदारांनी जमा केलेले दोन कोटी 56 लाख 35 हजार 610 रुपये बँकेच्या तिजोरीत जमा केले नाही. 

कालांतराने एका खातेदाराने त्याच्या खात्यातून जास्त रक्‍कम काढल्यानंतर आर्थिक हिशेब जुळत नसल्याचे बँक प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रशासनाने लेखापरीक्षण केले, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पवन वसंत शुक्‍ल (36, रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.