Thu, May 28, 2020 18:19होमपेज › Nashik › शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन मंजूर

नाशिक : शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन मंजूर

Published On: Aug 19 2019 1:58PM | Last Updated: Aug 19 2019 11:19PM

संग्रहित छायाचित्रनाशिक : प्रतिनिधी

लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह दर बुधवार आणि गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने दिली आहे. 
दरम्यान, चुंभळे यांच्या घरात लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा सापडल्यामुळे राज्य उत्पादन शुल्कने गुन्हा दाखल केला आहे. विभागाने चुंभळे यांचा ताबा मिळवण्याची मागणी न्यायालयात केली आहे. 

बाजार समितीच्या कार्यालयात एकास ई-नाम योजनेंतर्गत कंत्राटी कामगार म्हणून नियुक्तिपत्र देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना चुंभळे यांना शुक्रवारी (दि.16) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांना शनिवारी (दि.17) न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी व बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर चुंभळेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, तब्येत बिघडल्याची तक्रार केल्याने चुंभळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, चुंभळे यांच्या वतीने जामीन अर्जासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावर सोमवारी (दि.19) सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने अटी-शर्तींच्या अधीन राहून दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. 50 हजार रुपयांचा जातमुचलका, आठवड्यातील दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणे, तक्रारदार-साक्षीदारांवर दबाव न टाकणे, शहराबाहेर जाण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परवानगी घ्यावी, अशा महत्त्वाच्या अटी-शर्ती टाकून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, चुंभळे यांच्यावर सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू होते. 

घरात आढळला विदेशी मद्यसाठा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चुंभळे यांच्या घरी छापा टाकल्यानंतर घरात पाच लाख रुपयांहून अधिक विदेशी मद्यसाठा सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी करून चुंभळेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चुंभळे यांचा ताबा मिळावा असा युक्तिवाद विभागाने केला. त्यानुसार न्यायालयाने अर्ज मंजूर करीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंगाधिकार्‍यांना चुंभळे यांचा ताबा देण्यासाठी पत्र लिहिले आहे. 

बँक खात्यांची माहिती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजी चुंभळे यांच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच विभागामार्फत बँकांसोबत पत्रव्यवहार केले जात असून, चुंभळे यांच्या बँक खात्यांसह लॉकरची माहिती मागवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन बँकांमधील लॉकर्सची माहिती मिळाली असून, इतर माहिती काही दिवसांत मिळणार असल्याची शक्यता आहे.