Thu, Apr 18, 2019 16:02होमपेज › Nashik › रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; दागिन्यांची पर्स केली परत

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; दागिन्यांची पर्स केली परत

Published On: Jun 18 2018 6:57PM | Last Updated: Jun 18 2018 7:22PMपंचवटी : वार्ताहर 

रिक्षाचालक म्हटलं की, अरेरावी, उर्मटपणा, टपोरीपणा करणारा असे चित्र साहजिकच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. रिक्षाचालकांची अशी मलीन प्रतिमा मोडीत काढण्याचे काम  पंचवटी येथील एका रिक्षा चालकाने केले आहे. दोन लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स या रिक्षाचालकाने परत करत माणुसकीचे दर्शन घडवले. संजय पांडुरंग धोंगडे रा.  हिरावाडी असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथून नाशिकमध्ये नातेवाईकाच्या लग्नानिमित्त संदीप आमरे कुटुंबीय आले होते. या सोहळ्यानंतर आमरे कुटुंबीय सप्तश्रृंगी गडावर दर्शनाला जाण्यासाठी इंदू लॉन्स येथून रिक्षा क्रमांक एमएच १५ झेड ७२९९  मध्ये बसून दिंडोरी नाका येथे आले. यावेळी अनावधानाने ज्योती आमरे यांची दागिने असलेली बॅग त्या रिक्षातच विसरली. ही बाब त्यांच्या लक्षात येण्याच्या आधीच रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. त्याची चौकशी केली असता काहीच माहिती न मिळाल्याने आमरे दाम्‍पत्याने पंचवटी पोलिस ठाणे गाठून घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली .

मात्र, काही वेळातच रिक्षाचालकाने ज्योती आमरे यांना फोनवर संपर्क साधत 'आपण कोठे आहात आपली बॅग माझ्या रिक्षात राहिली आहे. ती देण्यासाठी कुठे येऊ याची विचारणा केली. ही बाब त्यांनी तात्काळ पोलिसांना सांगत रिक्षाचालक उभ्या असलेल्या ठिकाणी पोहचले व रिक्षाचालक संजय पांडुरंग धोंगडे रा.  हिरावाडी याना पंचवटी पोलिस ठाण्यात घेऊन आले. यावेळी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय ठमाळ यांनी प्रामाणिकपणे रिक्षात विसरलेली बॅग परत केली म्हणून संजय धोंगडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच ज्योती आमरे यांची दोन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग रिक्षाचालक संजय धोंगडे यांच्या हस्ते त्यांना परत करण्यात आली.