Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Nashik › अपूर्व हिरेंची निवडणुकीची तयारी

अपूर्व हिरेंची निवडणुकीची तयारी

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:51PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

भाजपा नेतृत्वाला गृहीत धरत शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. डॉ. हिरे यांनी रविवारचा (दि.7) मुहूर्त साधत ग्रामदैवत कालिका देवीचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी डॉ. हिरे यांनी भुजबळ समर्थक दिलीप खैरे यांच्याशी गुफ्तगू केल्याने प्रसंगी उमेदवारीसाठी ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधू शकतात, असा इशारा एकप्रकारे त्यांनी भाजपाला दिला असल्याचे बोलले जात आहे.

मागील काही वर्षांपासून विजनवासात गेलेले हिरे कुटुंबीय भाजपाची सत्ता आल्यापासून जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहे. आ. डॉ. अपूर्व हिरे हे नाशिक लोकसभा किंवा नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपाकडून योग्य मानसन्मान मिळत नसल्याने हिरे परिवार नाराज असल्याचे समजते. भाजपाकडून ऐनवेळी दगाफटका होण्याच्या भीतीपोटी त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वडील तथा माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या उपस्थितीत त्यांनी कालिका मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा केला. एकप्रकारे त्यांनी नाशिक लोकसभा किंवा विधानसभेसाठी स्वत:ची उमेदवारी घोषित केल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून हिरे यांनी कधी काळी त्यांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या भुजबळ यांच्याशी जुळवून घेतले आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या भुजबळ यांची मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अद्वय हिरे यांनी भेट घेतली होती. तसेच, भुजबळ समर्थकांनी काढलेल्या मोर्चालाही डॉ. अपूर्व हिरे यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी भाजपाच्या आमदाराची ही भूमिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. डॉ. हिरे यांनी त्याचवेळी भाजपा नेतृत्वाला एकप्रकारे हा दिलेला इशारा होता, असे बोलले जात आहे. दरम्यान, प्रशांत हिरे यांनी रविवारी प्रचाराचा शुभारंभ करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भुजबळांचा दाखला देत मते मिळविण्यासाठी सर्वांशी जुळून घ्यावे लागते, असा दाखला दिला. त्यांचे भुजबळ प्रेम बघता भविष्यात जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे.