Wed, Jul 17, 2019 18:55होमपेज › Nashik › खडसे, पाटील, अ‍ॅड. आंबेडकर यांच्या घरी ‘अन्याय पे चर्चा’

खडसे, पाटील, अ‍ॅड. आंबेडकर यांच्या घरी ‘अन्याय पे चर्चा’

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:40AMनाशिक : प्रतिनिधी 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक सोमवारी (दि.5) मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार असून ‘अन्याय पे चर्चा’ करणार आहेत. ही मोहीम पुढील काळात राज्यव्यापी करण्याच्या दृष्टीने भुजबळ समर्थक मंगळवारी (दि.6) शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भाजपात सध्या विजनवासात असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे व भारिपचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भुजबळ समर्थक भेट घेतील, अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनी लॉण्ड्रिंग व महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री भुजबळ हे मागील 22 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने वेळोवेळी फेटाळला. त्यामुळे भुजबळांवर अन्याय होत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. त्या विरोधात समता परिषदेने भुजबळ समर्थकांची मोट बांधली आहे. ठिकठिकाणी आंदोलन केले असून, त्यास सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांचे समर्थन मिळत आहे. भुजबळांच्या समर्थनासाठी जिल्हाभरात ‘अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. आता ही मोहीम राजव्यापी करण्यासाठीचे त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याची सुरुवात ते भुजबळांचे राजकीय विरोधक असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन करणार आहेत. सोमवारी (दि.5) राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ समर्थक शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. आ. पाटील यांनी त्यासाठी मंगळवारचा (दि.6) वेळ दिला असून, भुजबळ समर्थक त्यांच्या घरी ‘अन्याय पे चर्चा’ करणार आहेत.

शिवाय खानदेशातील भाजपाचा चेहरा असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगरमध्ये भेट घेऊन ‘अन्याय पे चर्चा’ करणार आहेत. तसेच, भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेण्यासाठी भुजबळ समर्थकांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे पुढील काळात भुजबळ समर्थक कोणत्या नेत्याच्या घरी ‘अन्याय पे चर्चा’ करतात याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

भुजबळांसाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार

राज्यातील सत्ताधारी भाजपा भुजबळांवर अन्याय करत असून, त्या विरोधात भुजबळ समर्थक विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. त्याची रणनीती ठरविण्यासाठी समता परिषदेची आज (दि.4) पंचवटीतील जयशंकर फेस्टिव्हल लॉन्समध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत ‘अन्याय पे चर्चा’ अधिक राजव्यापी कशी करता येईल, याबाबतदेखील चर्चा करणार आहेत.