Thu, Jun 27, 2019 18:05होमपेज › Nashik › देशात निवडणुकांशिवाय उद्योग उरलेले नाहीत : राज ठाकरे

देशात निवडणुकांशिवाय उद्योग उरलेले नाहीत : राज ठाकरे

Published On: Sep 02 2018 5:01PM | Last Updated: Sep 02 2018 5:37PMधुळे ः प्रतिनिधी

राज्यातील प्रत्येक शहराकडे पाहून वाईट वाटत आहे. देशात  निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही. प्रत्येक पक्ष स्वतःच्या  तुंबड्या भरून घेत आहेत. भारतीय जनता पार्टीने सत्तेत येण्यासाठी आश्‍वासने दिली. पण, नोटाबंदी करून जनतेलाच त्रास दिला. व्यापार्‍यांच्या मदतीने सत्तेत आलेले सरकार आता व्यापार्‍यांच्याच जिवावर उठले असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. 

धुळ्यात राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा झाला.  त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, महानगर अध्यक्ष डॉ. मनीष जाखेटे, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा प्राची कुलकर्णी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, अजय माळी, अ‍ॅड. जमील देशपांडे, नाशिकचे अशोक मुर्तडक बंटी सोनवणे यांच्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर तब्बल 30 वर्षांनी नरेंद्र मोदी सरकारला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. परंतु भाजपाच्या सरकारने  थापा मारण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या जनतेसाठी काहीच केले नाही. केवळ नोटाबंदी करून जनतेचे हाल केले. त्यांना निवडून देणार्‍या व्यापार्‍यांचीच त्यांनी वाट लावली. मोदींकडून  आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी व्यापार्‍यांना अनुकूल वातावरण निर्माण करण्याची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेणार, अशी घोषणा केली. पण नंतर तिकडे फिरकलेही नाही. नाशिकमध्ये विकास आम्ही केला आणि आता सरकार स्मार्ट सिटीच्या नावाखाली ती कामे दाखवत आहे. लाखो, कोटी रुपयांच्या कामांची मंत्री घोषणा करतात, पण या मंत्र्यांना कागद व पेन दिल्यास आकडेही लिहिता येणार नाही. भाजपावाले काँग्रेसच्या नावाने ओरडतात पण स्वतःचे काय? दुसर्‍यांची पोरे कडेवर घेऊन फिरण्यात भाजपाला काय आनंद वाटतो तेच कळत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच आपण स्वतः धुळ्यात लक्ष घालणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.