Sun, May 26, 2019 18:39होमपेज › Nashik › मनपाच्या करवाढीवरून प्रशासनाची सावध पावले

मनपाच्या करवाढीवरून प्रशासनाची सावध पावले

Published On: Apr 27 2018 11:21PM | Last Updated: Apr 27 2018 11:11PM नाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी सुचविलेला करवाढीचा प्रस्ताव आणि त्यानंतर नाशिककरांमध्ये उद्भवलेला रोष आणि महासभेने केलेल्या तीव्र विरोधामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. आचारसंहितेच्या काळातच महासभा घेतल्याचे सांगत मनपाने या विषयाचा चेंडू थेट निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात टोलवला आहे. मात्र, यावर जिल्हा प्रशासनाने सावध पावले टाकत सध्यातरी कोणतेच भाष्य करणे टाळले आहे. 

महापालिकेतील विषय करवाढीशी संबंधित आहे. प्रशासनाने करवाढ सुचविली असून, आयुक्त मुंढे करवाढीबाबत ठाम आहे. दुसरीकडे या कराला जिझिया म्हणत लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. त्यासंदर्भात गत सोमवारी महासभा घेण्यात येऊन त्यात ही करवाढ स्थगित करण्यात आली. त्यामुळे सदस्यांनी काहीसा सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र, विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या काळात महासभा घेतली हे कारण दाखवित थेट जिल्हाधिकार्‍यांकडे हा विषय तक्रार स्वरूपात आला आहे. त्यामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

जिल्हा प्रशासनाने तक्रारीबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या बाबतीत निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय अपेक्षित आहे. निर्णय घेतानाही नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत फार विचार करून प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या सर्व बाबतीत जिल्हा प्रशासन सर्व स्तरावर अभ्यास करत आहे. मात्र, त्याचवेळी मनपात या विषयावर विविध चर्चांना ऊत आला आहे.