Sun, May 26, 2019 11:37होमपेज › Nashik › अ‍ॅपे रिक्षाच्या धडकेत पंचवटीत मुलाचा मृत्यू

अ‍ॅपे रिक्षाच्या धडकेत पंचवटीत मुलाचा मृत्यू

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 01 2018 11:45PMनाशिक : प्रतिनिधी

गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्‍या अ‍ॅपे रिक्षाने  धडक दिल्याने  13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना फुलेनगर परिसरात घडला. दुर्गेश दीपक गिरी (13, रा. फुलेनगर) असे या मुलाचे नाव आहे. तर या अपघातात दोन व्यक्‍ती गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. रविवारी (दि.1) दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. 

अ‍ॅपे रिक्षाचालक दिलीप शंकर पगारे (48, रा. म्हसरूळ) यास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास संशयित रिक्षाचालक दिलीप पगारे हा एमएच 15 इजी 3173 क्रमांकाची अ‍ॅपे रिक्षा चालवत होता. एका एजन्सीचे गॅस सिलिंडर पोहचवल्यानंतर दिलीप भरधाव रिक्षा चालवत होता. रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेने जाणार्‍या लोकांच्या अंगावर रिक्षा गेली. त्यात परिसरात खेळणार्‍या दुर्गेशचा रिक्षाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर देवीदास तुकाराम गांगुर्डे (50, रा. फुलेनगर) आणि मोतीराम शिवराम लिलके (40, रा. वज्रेश्‍वरनगर) हे दोघे पादचारी गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तिघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्गेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर दोघा जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी अ‍ॅपे रिक्षाचालक दिलीपला ताब्यात घेतले आहे.