Sun, Jul 21, 2019 10:09होमपेज › Nashik › आधार नोंदणी नि:शुल्कच!

आधार नोंदणी नि:शुल्कच!

Published On: Dec 17 2017 12:01AM | Last Updated: Dec 16 2017 11:45PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नियमानुसार आधारकार्ड दुरुस्तीसाठी 25 रुपये शुल्क लागू असून, नवीन आधारकार्ड नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले आहे. नवीन आधारकार्डासाठी कोणी शुल्क घेत असल्यास टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले. शहरात येत्या सोमवारपासून 14 नवीन केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

आधारकार्ड नोंदणी केंद्रावरून शहरात सुरू असलेल्या गोंधळाबाबत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांनी शनिवारी (दि.16) जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. या भेटीत आधारकार्ड काढताना नागरिकांना येणार्‍या समस्या यावेळी जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडण्यात आल्या. शहरात केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना पहाटेपासूनच केंद्रांवर रांगा लावाव्या लागतात. मात्र, दिवसाला केवळ 30 आधारची नोंदणी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार आ. फरांदे यांनी केली. तसेच काही केंद्रचालकांकडून कार्डासाठी पैसे घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, थंडी-गारठ्यात सर्वसामान्यांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांना आधारसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळेच केंद्रांवर टोकन सिस्टीम सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आ. फरांदेनी यावेळी केली.

शहरात 63 केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव महा-ऑनलाइनकडे पाठविला आहे. त्यातील  14  केंद्रे तातडीने सोमवारी (दि.18) सुरू करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने सहकार्य करत विभागीय कार्यालये, मनपा अंगणवाड्या तसेच इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे, योगेश हिरे, नगरसेविका हिमगौरी आडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.