Thu, Jul 18, 2019 16:41होमपेज › Nashik › डॉक्टर ठरले देवदूत, अन् पोलिस अडकले हद्दीच्या वादात

डॉक्टर ठरले देवदूत, अन् पोलिस अडकले हद्दीच्या वादात

Published On: Dec 28 2017 10:22AM | Last Updated: Dec 28 2017 10:24AM

बुकमार्क करा
पंचवटी : वार्ताहर

मुंबई-आग्रा महामार्गावरील  अमृतधाम चौफुली येथे एका  अपघातात गंभीर जखमी व्यक्तीवर रस्त्याने जात असलेल्या कळवणच्या डॉक्टरांनी उपचार करीत त्याचे प्राण वाचविल्याची घटना घडली. दोन मोटारसायकलच्या अपघातात सिनकर कुटुंबीयांच्या  एकाच्या तोंडाला आणि डोक्याला जबर मार लागला होता. अपघात झाला त्याचवेळी कळवण येथील उपजिल्हा  रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. सुहास  कोटक हे कळवणकडे जात होते. अपघात झाल्याचे बघून त्यांनी गाडी थांबविली आणि त्वरित जखमींवर उपचार सुरू केले. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी  रुग्णवाहिकेला फोन  करून मदत मागितली. या दरम्यान जखमींच्या तोंडातून रक्तास्राव होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज होती. डॉ. सुहास कोटक यांनी  आपल्याजवळील ऑक्सिजन पंप काढून तातडीने सुविधा उपलब्ध  करून दिली. यानंतर जखमींना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

हद्दीचा वाद चव्हाट्यावर

गेल्या आठवड्यात सोनसाखळी चोरीच्या घटनेत हद्दीचा वाद उद्भवला होता. अपघाताच्या या घटनेतही पुन्हा एकदा हद्दीचा वाद उफाळून आला. या अपघाताची माहिती बीट मार्शलला देण्यात दिल्यानंतरही त्यांनी ही पंचवटी पोलिसांची हद्द असल्याचे सांगितले होते. त्यावेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ हे द्वारका येथे होते. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  यावेळी घटनास्थळी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार पुजारी हे पोहचताच भुजबळ यांनी त्यांना  फटकारल्याचे बोलले जाते.