Wed, Apr 24, 2019 20:17होमपेज › Nashik › स्मार्ट सिटीत शहरांचा आत्मा जपा : डॉ. निरगुडकर

स्मार्ट सिटीत शहरांचा आत्मा जपा : डॉ. निरगुडकर

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 21 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर वाढले आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीबरोबरच शहराच्या विस्तारीकरणाचा वेगही वाढला आहे. या सगळ्या प्रक्रियेत शहरांचे योग्य नियोजन करणे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासाठी आव्हान आहे. ते योग्य पद्धतीने पेलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. नाशिक सिटिझन्स फोरमतर्फे दिला जाणारा आदर्श नगसेवक पुरस्कार वितरणप्रसंगी ते नाइस सभागृहात बोलत होते. नगरसेवक अजय बोरस्ते, शशिकांत जाधव, सतीश कुलकर्णी यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. व्यासपीठावर नाशिक मनपाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक भास्कर मुंढेे, नाइसचे सुनील भायभंग, विक्रम सारडा, जितूभाई ठक्कर, हेमंत राठी आदी उपस्थित होते.

डॉ. निरगुडकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील दुष्काळ, सोयी सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. त्यामुळे शहरांतील पायाभूत गरजांबरोबरच अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती घरी परतेल काय याची काळजी घरातील व्यक्तींना वाटते. शहरांमधील वाहतूक व्यवस्था, त्यातून होणारे अपघात किती भयंकर वळणावर पोहोचले आहेत याचाच प्रत्यय यामुळे येतो. खड्डेमुक्त  रस्ते, सीसीटीव्ही, पर्यावरण याबरोबरच सुरक्षित शहरांची रचना निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचे स्मार्ट नियोजन करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्या-त्या शहराची वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नाशिक शहराला लाभलेली त्रिरश्मी लेणी, गोदाघाट तसेच इतर स्थळांचे संवर्धन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

तसेच आदर्श नगरसेवक पुरस्कार देतानाच यापुढे आदर्श अधिकारी पुरस्कार देण्याची सूचना डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केली. तसेच नगरसेवकांनी आपल्या होर्डिंगची उंची वाढविण्यापेक्षा कामांची उंची वाढवावी असे सांगितले. यावेळी डॉ. निरगुडकर यांनी विविध मुद्यांवर प्रकाशझोत टाकला.

भास्कर मुंढे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही लोकशाहीची दोन चाके असून, त्यांनी हातात हात घालून काम केल्यास शहराचा विकास साधणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच शहराच्या विस्तारीकरणामुळे शहराच्या नियोजनाचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले. सुनील भायभंग यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते.