Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Nashik › जिल्हा परिषद करणार दुसर्‍या मुलीच्या जन्माचे स्वागत

जिल्हा परिषद करणार दुसर्‍या मुलीच्या जन्माचे स्वागत

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:27AMसिन्‍नर : प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात सध्या दर हजार नवजात बालकांमध्ये मुलींचे सरासरी प्रमाण 930 इतके आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने दुसर्‍याही मुलगीच्या जन्मासाठी खास स्वागत योजना सुरू केली आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून गर्भपाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ज्या दाम्पत्यांना प्रथम अपत्य मुलगी असून दुसर्‍यांदा मुलगी जन्माला आल्यास पाच हजारांचे बचत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील  106  प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 590 उपकेंद्रांमध्ये  1 जानेवारी 2018 ते 31 मार्च 2018 या  तीन महिन्यांच्या कालवधीत पहिली मुलगी असतानाही जन्माला येणारी दुसरी मुलगी मुलीच्या जन्माचे स्वागत योजनेसाठी पात्र ठरणार आहे. जन्मलेल्या मुलीचे पालक नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.  सोबतच या महिलेची प्रसूती ही प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेली असावी. खासगी दवाखान्यात किंवा घरी प्रसूती झालेल्या महिलांच्या मुलींना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडे योजनेचे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत.  

योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी दाखला, शासकीय संस्थेतील महिला प्रसूतीपूर्व नोंदणी कार्ड, मुलीच्या जन्माचा दाखला आदी कागदपत्रांसह परिपुर्ण  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडे सादर करावा लागणर आहे. त्यानंतर त्या प्रस्तवाची  पंचायत समिती स्तरावर पडताळणी होऊन तालुका आरोग्य अधिकार्‍यांमार्फत मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार आहे. 

दोनपेक्षा अधिक मुली असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. बचत प्रमाणपत्र मुलीच्या नावे देऊन वारस म्हणून आई-वडिलांचे नाव लावले जाणार आहे. स्टेट बँक किंवा तालुकास्तरावर स्टेट बँकेची शाखा नसल्यास अन्य राष्ट्रीयकृत बँकेतील योजनेचे बचत प्रमाणपत्र संबंधीत दाम्पत्यांला दिले जाईल. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या अभिनव योजनेचा ग्रामीण भागातून उत्सफुर्त स्वागत केले जात आहे.

अर्थसंकल्पात 40 लाखांची तरतूद

ग्रामीण भागात पहिली मुलगी असतानाही दुसरी मुलगी जन्मास आल्यास या मुलीच्या नावे पाच हजार रुपये रकमेचे 18 वर्षे मुदतीचे बचत प्रमाणपत्र  तिच्या पालकांकडे दिले जाणार आहे. तर दुसर्‍या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली जन्मास आल्यास दोघींसाठी प्रत्येकी अडीच हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र दिले जाईल.  ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने सेस निधीअंतर्गत अर्थसंकल्पात 40 लाखांची तरतूद केली आहे.