Tue, Feb 19, 2019 14:57होमपेज › Nashik › विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे होणार हलके

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे होणार हलके

Published On: Aug 19 2018 1:32AM | Last Updated: Aug 18 2018 10:47PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझेे कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांमध्येच प्लास्टिकच्या रॅक बसविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तूर्त तरी प्राथमिक अवस्थेत असलेल्या या प्रस्तावाला मान्यतेचे सोपस्कार आणि निधी प्राप्त करून घेण्याचे दिव्य पार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त पाण्याची बाटली, जेवणाचा डबाही दप्तरातच असल्याने वजन वाढणे साहजिक आहे. या वजनामुळे मात्र विद्यार्थ्यांना पाठीचे, मणक्याचे आजार जडत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्या लक्षात घेऊन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश सर्वच शाळांना दिले होते. याचवेळी दप्तराचे ओझे नेमके किती असावे, असा दंडक घालून दिला होता. खासगी शाळांनी यानुसार उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले. आतापर्यंत याकामी मागे असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानेही दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उचल खालली आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3330 शाळा असून, यात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या पावणेतीन लाखांच्या दरम्यान आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे दप्तर ठेवण्यासाठी प्लास्टिकची रॅक बसविण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. या रॅकमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तके ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास दप्तराच्या ओझ्याचा ताणच राहणार नाही, असा विचार करण्यात आला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना दप्तराची ने-आण करण्याची गरज राहणार नाही. 

स्थायी समितीच्या सभेत हा विषय चर्चेत आला तेव्हा मात्र त्यावर काही सदस्यांनी मते नोंदविली. सरकारने प्लास्टिकला बंदी घातल्याने प्लास्टिकच्या रॅक कशा बसविणार, अशी शंका उपस्थित करण्यात आली. तेव्हा सरकारचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव मार्गी लावण्याची सूचना करण्यात आली.