होमपेज › Nashik › जि.प.मुख्याधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना फटकारले

जि.प.मुख्याधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना फटकारले

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 12:02AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासमोर सार्‍याच खातेप्रमुखांची पोलखोल झाल्यानंतर गिते यांनी त्याचदिवशी तत्काळ बैठक घेत खातेप्रमुखांना फटकारले. रात्री आठपर्यंत बसून सार्‍याच फायली निकाली काढण्याचे कामही सुरू होते.  

सभेत सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी प्रत्येक विभागाला प्राप्त निधी आणि त्यापैकी झालेला खर्च यावर सभेत प्रकाशझोत टाकला होता. कृषी विभागाला प्राप्त झालेले सौरउर्जाचा  निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाला औषध खरेदीसाठी 2016-17 मध्ये एक कोटी रुपये प्राप्त झालेले असताना तांत्रिक मान्यतेअभावी ही खरेदी रखडली. कुपोषित बालकांना पोषण आहार पुरविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त निधीपैकी 30 लाख रुपये खर्चाचा हिशेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांना देता आला नाही.

विशेष म्हणजे, डॉ. कुंभार्डे यांच्याकडे असलेली आकडेवारी आणि गिते यांना मुख्य लेखा व वित्ताधिकारी सोनकांबळे यांनी दिलेली माहिती यात तफावत आढळली.  शालेय पोषण आहार योजनेच्या 52 कोटी रुपयांपैकी 25 कोटी रुपयांचा हिशेब प्राथमिक शिक्षण विभागाला देता आला नाही.  बांधकाम विभागाच्या 150 कामांना कार्यारंभ आदेश वर्षभरापासून देण्यात आले नाही. यासारख्या सार्‍याच प्रश्‍नांवर डॉ. कुंभार्डे यांनी खातेप्रमुखांना जाब विचारला. कामेच होत नसल्याने सदस्य म्हणून निवडून आल्याची आम्हालाच आता लाज वाटू लागली आहे, अशी उद्विग्नताही त्यांनी सभागृहात बोलून दाखविली. कुपोषित बालकांच्या प्रश्‍नावरून डॉ. भारती पवार यांनीही अशीच हतबलता व्यक्त केली होती. 

पहिलीच सभा असल्याने गिते यांनी संयम पाळला. पण, सभा संपताच सगळ्याच खातेप्रमुखांची बैठक घेत त्यांनी संबंधितांना फैलावर घेतले. एक सदस्य एवढा अभ्यास करून येतो आणि आपण उत्तरे देऊ शकत नाही, अशा शब्दात खातेप्रमुखांची कानउघडणी करण्यात आली. यापुढे अशा पद्धतीचे कामकाज खपवून घेतले जाणार नसल्याची तंबी द्यायलाही गिते विसरले नाहीत.