Sat, Aug 17, 2019 16:47होमपेज › Nashik › जिल्हा परिषदेत रंगले बदलीनाट्य

जिल्हा परिषदेत रंगले बदलीनाट्य

Published On: Jun 03 2018 1:17AM | Last Updated: Jun 02 2018 10:38PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुशीलकुमार वाक्चौरे यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाल्यानंतर ते वैद्यकिय रजेवर गेले आहेत. तर त्यांच्या जागी बदली झालेले डॉ. विजय डेकाटे पद्भार घेण्यासाठी हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे. दोन अधिकार्‍यांमध्ये बदलीवरून नाट्य सुरू असल्याचे कर्मचार्‍यांमध्ये  आरोग्य अधिकारी नेमके कोण याबाबत उत्सुकता आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच वाक्चौरे यांची बदली झाली होती. पण, बदल्यांचा हंगाम नसल्याने त्यांनी मॅटमध्ये या बदली आदेशाला आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांची बदली स्थगित झाली होती. यावेळी मात्र पुन्हा त्यांचे बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांच्या जागी डेकाटे यांची नियुक्ती झाली आहे. वाक्चौरे यांनी पद्भार सोडून बदलीच्या ठिकाणी हजर होण्याऐवजी वैद्यकिय रजा टाकण्यातच धन्यता मानली आहे. तर प्रशासनानेही त्यांना कार्यमुक्त करण्याची तत्परता दाखविली नाही. 

शुक्रवारी डेकाटे पद्भार घेण्यासाठी जिल्हा परिषदेत आले असता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याशी त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांना आल्या पावली परतावे लागले. शनिवारी सकाळीही ते पुन्हा जिल्हा परिषदेत आल्यानंतर गिते दौर्‍यावर असल्याचे पुन्हा भेट टळल्याने डेकाटे परतले. एकंदरीत बदलीवरून  दोघा अधिकार्‍यांमध्ये नाट्य रंगले आहे. चार वर्षे झाल्यानंतरही वाक्चौरे नाशिक सोडायला तयार नाही. बदली रद्द करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. तर डेकाटे हेही नाशिक जिल्हा परिषदेतच रूजू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दोघांमध्ये रंगलेल्या नाट्यात आरोग्य विभागात मात्र नवीन अधिकारी नेमका कोण याबाबत उत्सुकता आहे. सोमवारी पद्भार घेण्यासाठी गिते यांची भेट घेणार असल्याचे डेकाटे यांनी सांगितले.