होमपेज › Nashik › नाशिक जिल्हा परिषदेने खुर्चीसाठी मोजले चार लाख रुपये

नाशिक जिल्हा परिषदेने खुर्चीसाठी मोजले चार लाख रुपये

Published On: Feb 08 2018 1:40AM | Last Updated: Feb 08 2018 1:40AM



नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे (पश्‍चिम) विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांची जप्त झालेली आणि खुर्ची संगणक परत मिळविण्यासाठी चार लाख 17 हजार रुपये मोजण्यात आले. यासाठी सेस फंडात अधिकार्‍यांच्या अग्रीमसाठी केलेल्या तरतुदीला हात घालण्यात आला.

दिंडोरी तालुक्यात बंधार्‍यांच्या कामासाठी भूसंपादन केले. पण, वाढीव मोबदल्यासाठी दहा शेतकर्‍यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. भूसंपादनावेळी संमतीपत्रकानुसार ठरलेली रक्कम देण्यात आली. पण, वाढीव 44 लाख रुपयांची मागणी संबंधित शेतकर्‍यांनी केली. एवढी रक्कम देण्यास लघुपाटबंधारे विभाग असमर्थ ठरल्याने गेल्या आठवड्यात न्यायालयाच्या आदेशानुसार वाघमारे यांची खुर्ची तसेच दोन संगणक जप्त करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात ही कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे, दुसर्‍यांदा खुर्ची जप्त होण्याच्या प्रसंगाला अभियंत्याला सामोरे जावे लागले होते. खुर्ची परत आणण्यासाठी चार लाख 17 हजार रुपये प्रशासनाने मोजले आहेत. अधिकार्‍यांच्या अग्रीमसाठी सेस फंडात तरतूद असून, त्यातूनच एवढ्या रकमेचा धनादेश न्यायालयात देण्यात आल्यानंतर खुर्ची व संगणक परत मिळाले आहेत.