Fri, May 24, 2019 03:13होमपेज › Nashik › सहा हजार विद्यार्थ्यांची जि.प. शाळांतून गळती

सहा हजार विद्यार्थ्यांची जि.प. शाळांतून गळती

Published On: Mar 14 2018 12:51AM | Last Updated: Mar 14 2018 12:00AMनाशिक : प्रतिनिधी

आता ग्रामीण भागातही खासगी शाळांचे पेव फुटलेे असून, जिल्हा परिषदेच्या शाळांतून अवघ्या वर्षभरात तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांची गळती झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. दरवर्षीच घटणारी विद्यार्थ्यांची पटसंख्या प्राथमिक शिक्षण विभागाला विचार करायला लावणारी ठरत आहे. 

नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या एकूण 3,325 शाळा असून, यात प्राथमिक 2,643 तर उच्च प्राथमिक 682 शाळांचा समावेश आहे. ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या घटकांचीच मुले या शाळांमध्ये शिक्षण घेत असून, त्यांच्यासाठी या शाळांचाच पर्याय उपलब्ध आहे. पण, आता शहरी भागापुरत्या मर्यादित असलेल्या खासगी शाळांनी ग्रामीण भागातही हातपाय पसरले आहेत. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांवर होत असल्याचे दिसून येत आहे. पटसंख्या कमी असल्याने राज्यभरातील 1,300 शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यंदा तर नाशिक जिल्ह्यातील तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला रामराम करीत खासगी शाळांचा रस्ता धरला आहे. 

अशी आहे आकडेवारी : 2016-17 मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख 85,658 इतकी होती. त्यात एक लाख 45,225 मुले तर एक लाख 40,433 मुली होत्या. चालू वर्षात म्हणजे 2017-18 मध्ये विद्यार्थी पटसंख्या दोन लाख 79,710 इतकी नोंदविण्यात असून, त्यात एक लाख 42,568 मुले आणि एक लाख 37,442 मुली आहेत. म्हणजे एकूण सहा हजार मुलांनी खासगी शाळेचा आसरा घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यात जेवढ्या मुली तेवढेच मुले आहेत. 

सोयी सुविधांचा परिणाम : दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. खासगी शाळा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये सुविधा तर दूरच पण, इमारतीभोवती संरक्षक भिंती बांधण्यासही उदासीनता दाखविली जात आहे.