Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Nashik › जि.प.च्या साडेनऊशे शाळा मैदानाविना

जि.प.च्या साडेनऊशे शाळा मैदानाविना

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 1:20AMनाशिक : प्रतिनिधी

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही ई -लर्निंगचा आग्रह धरला  जात असताना दुसरीकडे मात्र बर्‍याचशा शाळा ह्या भौतिक सुविधांसाठीच झगडत असल्याचे समोर आले आहे. अजूनही साडेनऊशे शाळांना स्वत:ची मैदानेे नसल्याने मैदानी खेळांपासून विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागत असल्याचे चित्र आहे. 

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळांकडेही लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन  नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेतील समारोपाप्रसंगी करण्यात आले. एवढेच नाही तर आदिवासी भागातील शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी दोन कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली.  खासगी शाळांना परवानगी देताना तर भौतिक सुविधा आहेत की नाही, याचीही पडताळणी करून घेतली जाते. भौतिक सुविधा उपलब्ध करून न देणार्‍या शाळांना परवानगीही नाकारली जाते. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्याच शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवा असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने नसलेल्या शाळांची संख्या साडेनऊशेच्या घरात आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी अशा शाळांची संख्या 939 होती. त्यात घट होण्याऐवजी वाढच झाली. 

ज्या आदिवासी तालुक्यांमधील शाळांमध्ये ई-लर्निंगचा आग्रह धरण्यात आला, त्या सुरगाणा तालुक्यातील 222, त्र्यंबक तालुक्यातील 113 शाळा मैदानाविनाच आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या बर्‍याच शाळा ह्या गावठाणच्या जागेवर आहेत. तर काही शाळांना जागा मिळाली पण, त्याठिकाणी नुसतीच इमारत उभी राहिली. म्हणजे जागा पुरेशी नव्हती, असे कारण पुढे करण्यात आले. आता इमारतीपुरतीच जागा मिळाल्याने मैदान तर दूरच राहिले. मैदानच नसल्याने मैदानी खेळ खेळणे दुरापास्त झाले आहे.  

खासगी शाळांनी ग्रामीण भागातही हातपाय पसरले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसमोर आव्हान निर्माण केले आहे. पटसंख्या टिकविताना तारेवरची कसरत  शिक्षक आणि मुख्याध्यापकांना करावी लागत आहे. त्यात साध्या साध्या भौतिक सुविधा मिळत नसतील तर विद्यार्थी संख्या टिकून राहण्याविषयी साशंकता आहे.